शिवसह्याद्री प्रतिष्ठान कल्याण पूर्व माध्यमातून लोहगड सफाई मोहीम फत्ते.....
शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे लोहगड किल्ला स्वच्छता मोहीम
किल्ल्याचा इतिहास समजावून तरुणाईमध्ये जनजागृती
कल्याण, ता. ११ (वार्ताहर) ः कल्याण पूर्वेतील शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रविवारी (ता. ७) ऐतिहासिक लोहगड किल्ले सफाई मोहीम पार पडली. या वेळी ६० जणांच्या पथकाने गडावरील कचरा वेचून स्वच्छता केली.
कल्याणमधील शिवसह्याद्री प्रतिष्ठान यांच्यामार्फत सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासत अनेक उपक्रम राबविले जातात. या अनुषंगाने आजच्या पिढीला गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजण्यासाठी शिवसह्याद्री प्रतिष्ठानाकडून दरवर्षी गड-किल्ले सफाई मोहिमेचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी रायगड, शिवनेरी, सिंहगड, राजगड किल्ल्यांवरही स्वच्छता मोहीम राबविली आहे.
यंदाच्या वर्षी रविवारी पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील लोहगडाची स्वच्छता मोहीम तब्बल ६० जणांच्या पथकाने केली. संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगड किल्ल्याच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले. यामध्ये युवक, युवती, शिवभक्त सदस्य यांचा समावेश होता. चमूतील शिवभक्तांनी लोहगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देऊन वातावरण उत्साहित केले. याप्रसंगी लोहगडाचे ऐतिहासिक महत्त्व सांगण्यात आले. एकीकडे मोबाईलचा अति वापर, व्यसनाधीनतेकडे वळू पाहणाऱ्या युवा पिढीला आपल्या पूर्वजांचा इतिहास, शरीरसंपदा यांचे महत्त्वदेखील यानिमित्ताने पटविण्यात आले.
या मोहिमेचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीश पेडणेकर यांच्या वतीने करण्यात आले होते. मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शरद बिरामणे, उपाध्यक्ष संजय पाटील, खजिनदार उमेश रेडेकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. सतीश पेडणेकर यांनी सांगितले, की गड-किल्ले यांचे ऐतिहासिक महत्त्व जाणून घेणे आजच्या तरुणाईच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असल्याने शिवसह्याद्री प्रतिष्ठान स्वच्छता मोहीम दरवर्षी राबविते. स्वच्छता मोहिमेत विद्यार्थिनी श्रुती मानगुटकर यांनी, शिवसह्याद्री प्रतिष्ठान वतीने लोहगड स्वच्छता मोहीम प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण असल्याचे सांगितले.
संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट
विद्यार्थी, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक आणि शिक्षक यांनी गडावर महादेव मंदिर, हनुमान गेट, विंचू कडा, महाद्वार अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता केली. या माध्यमातून कचरा, प्लॅस्टिक बाटल्या, काचेचे तुकडे गोळा करून संकलित कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली जाते. सर्व कचरा गोळा करून कचराकुंडीत टाकण्यात आला. गडावरील पाणवठ्यामधील प्लॅस्टिक बाटल्या काढून तो पाणवठा साफ करण्यात आला.
सरकारदरबारी पत्रव्यवहार करणार
गडावर शिवभक्तांची पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शौचालय दुरवस्थेप्रश्नी सरकारदरबारी पत्रव्यवहार करणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

