पाओलीला योग्य भाव दया
पावलीला योग्य भाव द्यावा
विक्रमगडमधील शेतकऱ्यांची मागणी
विक्रमगड, ता. ११ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवत असते. हे गवत व भातझोडणी करून राहत असलेल्या पेंढ्याची (पावलीची) विक्री करून थोडेफार पैसे मिळवतो; मात्र गवत व पावलीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. पावली व गवताला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
विक्रमगड तालुका हा गवत-पेंढा खरेदी करणाऱ्यांचे कोठार म्हणून ओळखले जाते. तालुक्यातील केव परिसर, गडदे, झडपोली, दादडे, उपराळे, आलोंडे, मलवाडा अशा विविध ठिकाणी पावलीच्या वखारी सुरू झाल्या आहेत. वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी गवत पावली विकण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील वखारीत येतात. गेल्या वर्षी तालुक्यात गवत व पावली खरेदी करणाऱ्या वखारी २५ होत्या. या वर्षी मात्र त्यांची संख्या कमी होऊन अंदाजे सात ते आठ झाली आहे. हे गवत व पावलीला प्रेस मशीनद्वारे तारेच्या साहाय्याने सहा ते सात टनाच्या गठड्या बनवून मुंबई, वसई, नालासोपारा, ठाणे, गोरेगाव भागातील तबेल्यांना विक्री केल्या जातात; मात्र या पावलीला योग्य भाव नसल्याने वखारी मालक मागणीनुसार वखारीत साठवणूक करून ठेवतात. पावसाळ्यात पावलीला मोठी मागणी व योग्य भाव मिळत असल्याने वखारी मालक त्या काळात त्याची विक्री करतात. या वर्षी पावलीला योग्य भाव न दिल्यास आम्हाला तोट्यात जावे लागेल, असे वखारी मालकाचे म्हणणे आहे. या पूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पावलीला खरेदी केली होती; परंतु त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्र बंद करण्यात आली होती. आता खासगी व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत.
बैलगाडीवाले व मंजुरांना मिळतो रोजगार
वखारीमध्ये गवत रचण्यासाठी व प्रेसमध्ये गठड्या रचण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळे एका वखारीत ४० ते ५० मजुरांना रोजगार मिळतो. तालुक्यात सात ते आठ वखारी सुरू असून अंदाजे ५०० ते ६०० मजुरांना या वखारीद्वारे रोजगार मिळत आहे. त्याचप्रमाणे गवत पावली ने-आण करण्यासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात असून बैलगाडीमधून पावली आणणाऱ्या एका फेरीला १५० ते २०० रुपये भाडे वखारी मालक देतात.
इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी भाव
विक्रमगड तालुक्यात सध्या पावलीला प्रति टन ३,५०० ते ३,८०० रुपये भाव मिळत आहे. गेल्या वर्षी पावलीला ३,९०० ते ४,००० रुपये प्रति टन भाव मिळत होता. इतर तालुक्यांतील काही भागात पावलीला ४,००० ते ४,२०० रुपये प्रति टन भाव दिला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी नाराज असून इतर तालुक्यांप्रमाणे भाव वाढवून देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
वाढती महागाई तसेच शेती अवजारे, खते, बियाणे यांचे वाढते भाव, मजुरांची मजुरीही वाढली आहे. शेती उत्पन्नाच्या तुलनेत जास्त खर्च येतो. तसेच भातालाही योग्य भाव मिळत नसल्याने पावलीला सहा हजार रुपये प्रति टन भाव द्यावा.
- सदानंद कनोजा, शेतकरी
शेतीचा वाढता खर्च बघता या वर्षी तरी गवत व पावली खरेदी करणाऱ्या व्यापारीवर्गाने भाव वाढवून द्यावा. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
- गजानन पाटील, शेतकरी, विक्रमगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

