कुपोषणात अडकले बालपण
नंदकिशोर मलबारी : सकाळ वृत्तसेवा
सरळगाव, ता. ११ : मुरबाड तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये कुपोषणाचे संकट अधिक तीव्र होत आहे. बालविकास विभागाने केलेल्या नुकत्याच सर्वेक्षणात तब्बल नऊ सॅम (गंभीर कुपोषण) आणि १६२ मॅम (मध्यम कुपोषण) ग्रस्त बालके आढळली आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बंद झाल्याने स्थलांतरित आणि बालमजुरी करणाऱ्या मुलांना आरोग्यसेवा व शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हंगामाप्रमाणे अनेक आदिवासी कुटुंबे पालकांसोबत मोलमजुरीसाठी इतर भागा''त स्थलांतरित होतात. दरवर्षी नोव्हेंबरपासून मातीच्या विटा तयार करणे, काँक्रीटचे खांब बनविणे, शेतीकाम अशा हंगामी कामांना सुरुवात होते. या कामांसाठी मुरबाड तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील शेकडो आदिवासी कुटुंबे लहान मुलांसह शहरी भागातील वीटभट्ट्यांवर किंवा पुणे जिल्ह्यातील शेतीकामावर स्थलांतर करतात. अशा वेळी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. तसेच, लहान बालकांच्या आरोग्याकडेही पुरेसे लक्ष दिले जात नाही. परिणामी, कमी वजन, अपुरा आहार आणि कुपोषणाचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्थलांतरित होत असलेल्या मुलांचा आरोग्य आणि शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने स्थलांतरित बालकांना हक्काचे शिक्षण स्थलांतरित ठिकाणी मिळावे. त्यांची बालमजुरीपासून मुक्तता व्हावी, यासाठी
ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सुरू केला होता.
राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बंद
स्थलांतरित आणि बालमजूर मुलांसाठी केंद्र सरकारच्या श्रम मंत्रालयाने मुरबाड, भिवंडी, शहापूर, कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यात राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सुरू केला होता. हा प्रकल्प तब्बल नऊ वर्षे कार्यरत होता. प्रत्येक तालुक्यात केंद्रे स्थापन करून पर्यवेक्षक, सेवक आणि लिपिक यांच्या माध्यमातून स्थलांतरित क्षेत्रांत मुलांची गणना, शैक्षणिक सुविधा आणि भोजनाची व्यवस्था केली जात असे. मात्र, कोरोनाकाळात हा प्रकल्प विस्कळित झाला आणि त्यानंतर पुन्हा सुरू झाला नाही. राज्य सरकारनेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याची टीका होत आहे.
टोकावडे येथे सुविधा
मुरबाड तालुक्यातील मुरबाड एक आणि मुरबाड दोन अशा विभागांत सॅम नऊ आणि मॅम १६२ अशी कुपोषित बालकांची संख्या नोंदवण्यात आली आहे. ही सर्व बालके पूर्ण कुपोषित नसली, तरी अनेक मुलांचे जन्मत: वजन कमी असते. अशा बालकांना टोकावडे येथे उपचारासाठी पाठवले जाते. त्या ठिकाणी मातांसाठीही भोजनाची व्यवस्था असूनही अनेक माता तिथे दाखल होत नसल्याची माहिती टोकावडे येथील अधिकारी अपर्णा भोईर आणि मुरबाड विभागाच्या अधिकारी निशा तारमळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

