ऑपरेशन लोटस कोमेजले
ऑपरेशन लोटस कोमेजले
महायुतीच्या चर्चेमुळे भाजपमध्ये अस्वस्थता
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ ः शिवसेनेच्या ताब्यात गेलेला ठाणे जिल्ह्याचा गड पुन्हा काबिज करण्यासाठी भाजपने गेल्या काही महिन्यांपासून सुरू केलेली ‘ऑपरेशन लोटस’ मोहीम कोमेजण्याच्या मार्गावर आहे. मुंबई आणि ठाणे महापालिकेत शिंदे गट आणि भाजपमध्ये महायुती होणार असल्याची चर्चा असल्याने भाजपमध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशांनाच अचानक ब्रेक लागला आहे. त्यामुळे खिंडीत सापडलेल्या शिंदे गटाचे शिलेदार हातचे जाणार असून, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शतप्रतिशत कमळ फुलवण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले जाणार असल्याची खंत भाजपच्या गोटात आहे.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला तरी एकेकाळी तो भाजपचा गड होता. ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या या जिल्ह्यात शिवसेना घराघरात रुजवली. तेव्हापासून जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. खासदार, आमदार, नगरसेवकांची संख्या कितीही असली तरी अखेरचा निर्णय हा शिवसेनाच घेत होती. ही मजबूत पकड दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनीही कायम ठेवली. आताही जिल्ह्यात भाजपचे आमदार सर्वाधिक असले तरी पालकमंत्रिपदासह मंत्रिपदे शिवसेना शिंदे गटाकडे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यावर असलेली ही पकड सैल करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्याच होमग्राउंडवर घेरण्यासाठी गेल्या वर्षभरापासून भाजपची एक फळी मैदानात उतरली आहे.
वनमंत्री गणेश नाईक यांनी जनता दरबारातून एकनाथ शिंदे यांच्यावर थेट हल्ला चढवण्यास सुरुवात केली, तर रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन जिल्ह्यात भाजपचे वजन वाढवण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. विशेषतः शिंदे गटाचे वर्चस्व असलेल्या ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेत मोहीम तीव्र करण्यात आली. त्याअंतर्गत कल्याण-डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देण्यात आला. यावरूनच वातावरण आणखी तापले नव्हे पेटले. दुसरीकडे ठाणे पालिकेतही सत्ता स्थापनेच्या दिशेने घोडदौड सुरू झाली. त्यासाठी घोडबंदर, जुने ठाणे, लोकमान्यनगर येथील माजी नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले. येत्या काही दिवसांमध्ये त्यांचेही पक्षप्रवेश होणे अपेक्षित असताना अचानक महायुतीच्या चर्चेने या मोहिमेला आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
मोर्चा ठाकरे गटाकडे
महायुतीतील घटक पक्षांतर्गत प्रवेशबंदीचा तह करण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे शिंदे गटातून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या अनेक इच्छुकांच्या आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत. घोडबंदरमधील एक मातब्बर कुटुंबाला त्यामुळे शेवटपर्यंत शिंदे गटात राहणार असल्याचे जाहीर करावे लागले, तर लोकमान्यनगर येथील ज्येष्ठ नगरसेवकाचाही पक्षप्रवेश थांबला असल्याचे समजते. वास्तविक डोंबिवलीत सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाली. तेव्हाच या दिलजमाईची कुणकूण लागली होती. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा भाजप बॅकफूटवर जाण्याची चिंता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपासून माजी नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, ऑपरेशन कमळ हे सुरू राहणार आहे, मात्र त्याची दिशा आता शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

