गुजरात–महाराष्ट्र सीमा वाद : दीड वर्षांनंतर संयुक्त मोजणीला अखेर सुरुवात
गुजरात-महाराष्ट्र सीमावाद संपणार!
तलासरी-उंबरगाव सीमेवर महसूल विभागाची संयुक्त कार्यवाही
तलासरी, ता. ११ (बातमीदार) ः महाराष्ट्र-गुजरात सीमावाद दीड वर्षे रखडला होता. अखेर तो मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तलासरी-उंबरगाव परिसरात दोन्ही राज्यांच्या महसूल विभागाने संयुक्त मोजणी व पडताळणी प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात केली आहे. यामुळे सीमाभागातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
वादाची पार्श्वभूमी
तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातमधील सोनसुंभा ग्रामपंचायतीने घुसखोरी करून स्वतःचे सीमांकन केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रशासनाने केला होता. यामुळे गेल्या वर्षभर दोन्ही राज्यांमध्ये छुपा संघर्ष निर्माण झाला. आंदोलन, निवेदन, तणावग्रस्त चर्चा, स्थानिकांची भूमिका अशा अनेक घटना या भागात घडल्या. वाद इतका तीव्र झाला, की तो थेट महाराष्ट्र विधानसभेत पोहोचला. डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी सभागृहात संयुक्त मोजणी करून संबंधित जमीन महाराष्ट्राच्या ताब्यात आणावी, अशी मागणी केली होती. त्यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासनाला तातडीने कारवाईची सूचना दिली होती.
नोंदी, नकाशे व भू अभिलेखांची पडताळणी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या हालचालींना गती मिळाली. ९ डिसेंबरपासून महाराष्ट्र व गुजरात महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर संयुक्त भू-मोजणी सुरू केल्याची माहिती प्रशासनाने दिली. या प्रक्रियेत दोन्ही राज्यांचे पथक एकत्र येऊन महत्त्वाचे दस्तऐवज तपासत आहे. यामध्ये जुन्या सातबारा नोंदी, गावनकाशे व सीमांकन कागदपत्रे, भूमी अभिलेख विभागातील मोजणी नकाशे, खत नमुने, रेकॉर्ड वही, दोन्ही राज्यांची ऐतिहासिक सीमा नोंद, प्रत्यक्ष जमिनीवरील सीमारेषांचे स्थान निश्चित करण्यासाठी दोन्ही बाजूंच्या महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणी केली.
अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत
वेवजी गावाच्या सीमाभागात गुजरातमधील उंबरगाव येथील सोनसुंभा ग्रामपंचायतीने ८०० मीटर ते एक किलोमीटरपर्यंत महाराष्ट्र हद्दीत अतिक्रमण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. विशेषतः तलासरी-उंबरगाव राज्यमार्गालगतच्या सर्वे क्र. १७३ मधील त्रिकोणी आकाराचा सुमारे ३०० मीटर भूखंड गुजरात प्रशासनाने रस्त्याला जोडल्याचे दिसून आले. हा रस्ता पुढे महाराष्ट्राच्या सर्व्हे क्र. २०४ मध्ये प्रवेश करतो. प्राथमिक निरीक्षणात १०० मीटरपर्यंत अतिक्रमण झाल्याचा निष्कर्ष पथकाने नोंदवल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
धोडी कुटुंबाचा पुढाकार
या सीमावादाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे काम दिवंगत शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांनी सुरुवातीला केले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आकाश धोडी यांनी पुन्हा एकदा सीमावाद सोडवण्यासाठी सक्रिय भूमिका घेतली. शासनाने गांभीर्याने लक्ष दिल्यास महाराष्ट्र-गुजरात सीमावादाचा कायमचा निकाल लागू शकतो, असे आकाश धोडी यांनी सांगितले.
अंतिम निर्णय केंद्राचा
सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून सीमावाद पुन्हा अधिवेशनात तापू नये, यासाठी प्रशासनाने संयुक्त मोजणीची गती वाढविल्याचे समजते. तलासरी व उंबरगावचे तहसीलदार, दोन्ही गावांचे सरपंच, गावविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तलाठी, भूमी अभिलेख अधिकारी, तसेच दोन्ही राज्यांचे पथक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोजणी प्रक्रिया पार पडली. संयुक्त मोजणीचा पूर्ण अहवाल दोन्ही राज्यांकडून केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असून अंतिम निर्णय केंद्राची समितीच घेणार आहे. सध्या विद्यमान हद्दी पूर्ववत कायम आहेत.
शांततेत तोडगा निघावा
दीड वर्षे कोणतीही कार्यवाही न झाल्याने सीमाभागात भय आणि असुरक्षिततेचे वातावरण होते; मात्र संयुक्त मोजणी प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला आहे. सीमा कायम न झाल्याने नागरिकांना कोणत्या राज्याकडून सुविधा मिळतील, याबाबत अनिश्चितता होती. पाणी, वीज, रस्ते, शासकीय योजना, आरोग्य सेवा या सर्वच सुविधांबाबत गोंधळ होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांची मागणी स्पष्ट केली आहे, की सीमा एकदाची निश्चित व्हावी. आम्हाला स्थिर सुविधा मिळाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
-----
कोट
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवरील वाद सोडविण्यासाठी दोन्ही राज्यांचे महसूल अधिकारी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार संयुक्त मोजणी करीत आहेत. प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित अहवाल सादर करण्यात येणार आहेत.
- अमोल पाठक, तहसीलदार, तलासरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

