दिव्यांग रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘आदर्श भूमिका’ पुरस्कार
दिव्यांग रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘आदर्श भूमिका’ पुरस्कार
मध्य रेल्वेकडून सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मध्य रेल्वेकडून आयोजित ‘दिव्यांग विशेष दिन’ कार्यक्रमात दिव्यांग रेल्वे कर्मचाऱ्यांचा बुधवारी (ता. १०) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात सन्मान करण्यात आला. महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांनी दिव्यांगत्वावर मात करून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या १६ कर्मचाऱ्यांना ‘आदर्श भूमिका’ पुरस्कार प्रदान केला.
पुरस्कारात स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्राचा समावेश असून, मुंबई विभागातील नऊ रेल्वे कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांनी प्रत्यक्ष सन्मानित केले. इतर विभागांतील सात कर्मचाऱ्यांचा सत्कार संबंधित विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मुंबईपर्यंत प्रवासाचा त्रास टळणार आहे. या कार्यक्रमात तीन दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिव्यांग-अनुकूल साहित्य देण्यात आले. कर्मचाऱ्यांना वापरास सोयीस्कर सॉफ्टवेअरसह लॅपटॉप देण्यात आले आहे.
स्वत:वर विजय मिळवणारे खरे विजेते
या वेळी बोलताना गुप्ता म्हणाले, स्वतःवर विजय मिळवणे हेच खरे यश आहे आणि दिव्यांग बांधवांनी तो विजय आधीच मिळवला आहे. अनेक अडचणींवर मात करून ते आज इतरांप्रमाणेच सक्षमपणे काम करत आहेत. मध्य रेल्वे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी आवश्यक साधने, कार्यस्थळी सुविधा आणि सर्वतोपरी मदत देत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी पी. पी. पांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमीच्या कलाकारांसह दिव्यांग कलाकारांनीही आकर्षक सादरीकरणे करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
१,२४० कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध
कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रोत्साहनपर संदेश दिला. मध्य रेल्वेच्या पाच विभागांतील, निर्माण संघटना आणि कार्यशाळांतील एकूण १,२४० दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी पुढेही उपक्रम सुरू राहतील, असे आश्वासन देण्यात आले. या वेळी अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेश मीना, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------------------------

