दादर स्थानकावर नवी मार्गिका; प्लॅटफॉर्म ८ लवकरच सुरू
दादर स्थानकावर नवी मार्गिका; प्लॅटफॉर्म क्र. ८ लवकरच सुरू
पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचा पश्चिम रेल्वेचा मानस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने इथे अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेने केली असून, नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक ८ दिला जाणार आहे.
सध्या दादर स्थानकामध्ये मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांसाठी ६ आणि ७ हे दोनच प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. पुढील काही वर्षांत गाड्यांची संख्या वाढणार असल्याने अतिरिक्त प्लॅटफॉर्मची आवश्यकता निर्माण झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या एमयूटीपी प्रकल्पातील पाचवी आणि सहावी मार्गिका तयार करण्याच्या कामातच ही नवी मार्गिका समाविष्ट आहे.
या प्रकल्पाचा खर्च सुमारे ७० कोटी रुपये आहे. नव्या मार्गिकेचे काम प्लॅटफॉर्म ७ च्या पूर्वेकडील जागेत सुरू आहे. सध्या हा भाग होम प्लॅटफॉर्म म्हणून वापरला जातो, पण नवी मार्गिका बसल्यानंतर तो आयलंड प्लॅटफॉर्म बनेल. सध्या ६ आणि ७ वरून नऊ रिटर्न गाड्या चालतात. नवीन प्लॅटफॉर्म सुरू झाल्यावर रिटर्न गाड्यांची संख्या वाढवणे शक्य होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिनी-टर्मिनलसारखी सुविधा
नव्या मार्गिकेसोबत ओएचई, सिग्नलिंग आणि क्रॉसओव्हर पॉइंट्सचे नवे नेटवर्क बसवले जात आहे. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकाला मिनी-टर्मिनलसारखी सुविधा मिळेल. सध्या सहावी मार्गिका माहीमपर्यंत पोहोचली आहे आणि ती पुढे मुंबई सेंट्रलपर्यंत नेण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर दादरचा प्लॅटफॉर्म क्रमांक ६ बंद करण्याची गरज पडू शकते. त्यामुळे प्लॅटफॉर्म ८ सर्वाधिक उपयोगी ठरणार आहे.
नव्या मार्गासाठी होणारे बदल
- दादर रेल्वे कॉलनीची भिंत हटवून पुन्हा बांधकाम
- दक्षिणेकडील पादचारी पुलाचा भाग आणि पीआरएसच्या जिन्याची पुनर्बांधणी
- यार्ड मास्टरचे कार्यालय पूर्वेकडे हलविणे
- ओएचई, सिग्नलिंग आणि टेलिकॉममध्ये बदल
- मध्य रेल्वेच्या मार्गिका जवळ असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक बदलण्याची शक्यता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

