शिंदेंचे कार्य सिंधी समाजाच्या घरोघरी गुंजणार
उल्हासनगर, ता. ११ (बातमीदार) : शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यप्रेमामुळे प्रेरित होऊन त्यांच्यावर आधारित सात सिंधी गाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. हा अनोखी गाण्याची भेट उल्हासनगरातील शिवसेना राज्य सिंधी समन्वयक जया साधवानी यांनी तयार केली आहे. नागपूर येथील देवगिरी बंगल्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या गाण्यांचे प्रकाशन पार पडले.
जया साधवानी यांनी काँग्रेसमध्ये उपमहापौर पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला होता. काँग्रेसमधील मरगळ आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होत असलेले विकासकामांचा वेग पाहून त्या प्रभावित झाल्या. लोकांना जोडून घेणाऱ्या त्यांच्या शैलीमुळे साधवानी यांनी सिंधी भाषेतून खास गाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या गाण्यांसाठी त्यांनी प्रसिद्ध सिंधी गायक, गीतकार आणि संगीतकार राज जूरयाणी यांना सोबत घेतले. शिंदे यांच्या कार्यशैली, लोकसहभागाचे धोरण आणि सामान्यांसाठी असलेली बांधिलकी या सर्वांचा भाव या गाण्यांतून उमटतो. सातही गाण्यांतून एकनाथ शिंदे यांची जनसंपर्कशैली आणि विकासाचे कार्य उभे राहत असल्यामुळे ही गाणी लवकरच सिंधी समाजाच्या घराघरांत गुंजतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
‘कशाला करता पर्वा’
विशेष म्हणजे, ‘कशाला करता पर्वा, एकनाथ बसले आहेत ना’ अशा शब्दांतले एक गाणे सिंधी समाजात विशेष लोकप्रिय होऊ लागले आहे. हिवाळी अधिवेशनामुळे उपमुख्यमंत्री शिंदे नागपुरात असताना साधवानी यांनी तेथेच भेट देत देवगिरी बंगल्यात ध्वनीफित प्रकाशनाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला विक्रम जग्याशी आणि राजू गायकवाड उपस्थित होते.

