नवी मुंबईत २.९२ कोटींचा महाघोटाळा उघड

नवी मुंबईत २.९२ कोटींचा महाघोटाळा उघड

Published on

गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक
दोन भावांविरोध गुन्हा; पोलिसांकडून शोध सुरू
नवी मुंबई, ता. ११ (वार्ताहर) : शेअर मार्केट व हंगरेली नावाच्या बनावट फूड डिलिव्हरी ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून दोन भावांनी शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून पलायन केले आहे. मंगेश हिरामण बोरसे व दिनेश हिरामण बोरसे अशी त्यांची नावे आहेत. नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या भावांविरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीसह अपहार, तसेच महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

मंगेश बोरसे व दिनेश बोरसे यांनी दोन वर्षांपूर्वी श्री फिनवेस्ट फायनान्शियल सर्व्हिसेस या नावाने कंपनी स्थापन करून त्याचे कार्यालय सानपाडा सेक्टर-३०ए मधील जी स्क्वेअर इमारतीमध्ये थाटले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. या प्रलोभनाला बळी पडून काही गुंतवणूकदारांनी बोरसे बंधूंच्या कंपनीत लाखो रुपये गुंतवले. त्यानंतर या बोरसे बंधूंनी यातील काही गुंतवणूकदारांचा एजंट म्हणून उपयोग करून घेत त्यांनी गुंतवणुकीसाठी ग्राहक आणल्यास त्यांना चांगले कमिशन देण्याचे प्रलोभन दाखवले.

कार्यालय बंद
त्यामुळे या एजंट लोकांनी चांगल्या परताव्याचे प्रलोभन दाखवून शेकडो ग्राहकांना या कंपनीत जोडले. या गुंतवणूकदारांना परतावा देण्याची वेळ आल्यानंतर बोरसे बंधूंनी स्वीगी व झोमॅटोसारखे हंगरेली नावाचे फूड डिलिव्हरी ॲप सुरू करण्याचा बहाणा केला. तसेच हंगरेली कंपनी सेबीकडे लिस्टेड असून, थोड्या दिवसांत त्या कपंनीचे आयपीओ लॉन्च होणार असल्याचे व त्यातून मोठा फायदा मिळणार असल्याचे प्रलोभन दाखवले. या प्रलोभनाला भुलून शेकडो गुंतवणूकदारांनी बोरसे बंधूंच्या कंपनीत लाखो रुपये गुंतवले. सुरुवातीला काही महिने बोरसे बंधूंनी परतावा दिला, मात्र मार्चपासून परतावा देणे बंद केले. त्यानंतर बोरसे बंधूंनी कार्यालय बंद करून पलायन केले.

तक्रार दाखल
फसवणूक झालेले गुंतवणूकदार सानपाडा येथील कंपनीच्या कार्यालयात गेल्यानंतर ते बंद असल्याचे आढळले. तसेच बोरसे बंधू त्यांचे फोनदेखील उचलत नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झालेल्यापैकी १७ तक्रारदारांनी एकत्र येऊन नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार या दोघा भावांविरोधात सानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या १७ गुंतवणूकदारांनी त्यांची २.९२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे, मात्र या प्रकरणात शेकडो लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे बोलले जात असून, इतर ७० ते ८० गुंतवणूकदार तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.

डॉक्टरला ९५ लाखांचा गंडा
हिंगोली जिह्यातील डॉ. रामदास पाचपिल्ले यांनी त्यांच्या परिचयातील डॉ. अनंत घुले यांच्या माध्यमातून बोरसे बंधूंची भेट घेतल्यानंतर बोरसे बंधूंनी प्रत्येक लाखावर दरमहा पाच हजार परतावा देण्याचे तसेच गुंतवणूक सुरक्षित-स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे डॉ. पाचपिल्ले यांनी डॉ. घुले व बोरसे बंधू यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सदर कंपनीत ९५ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर काही काळ बोरसे बंधूंनी त्यांना परताव्याचे मेसेज दाखवत त्यांना विश्वासात घेतले, मात्र वास्तवात हा सर्व परतावा एका बनावट हंगेरीली फूड डिलिव्हरी ॲपमध्ये वळवला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com