नागरी सुविधांसाठी काँग्रेस आक्रमक
नागरी सुविधांसाठी काँग्रेस आक्रमक
पालिका मुख्यालयात प्रशासनाविरोधात आंदोलन
विरार, ता. १३ (बातमीदार)ः महापालिकेच्या बांधकाम, आरोग्य, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, वृक्षप्राधिकरण विभागाअंतर्गत कोणतीच कामे होत नाहीत. पालिका प्रशासनाला जनतेच्या सोयीसुविधाबाबत सोयरसुतक राहिलेले नसल्याने आक्रमक झालेल्या काँग्रेसने पालिकेवर मोर्चा काढला.
वसई-विरार शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता. १२) पालिका मुख्यालयात आंदोलन करण्यात आले. महापालिका प्रशासनाने दिलेली लेखी आश्वासने पूर्ण केली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी पालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे काँग्रेस नेते अडून बसले. या वेळी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या वेळी आदिवासी वस्त्यांमध्ये आणि इतरत्र पिण्याचे पाणी देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना पाणी दिले जात नसल्याचे सांगितले. तसेच लवकरच आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दिनेश कांबळे, सचिव कॅ. नीलेश पेंढारी, जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा, प्रवीणा चौधरी, गीता वेरणेकर, विल्फ्रेंड डिसोजा, राधा अय्यर सहभागी झाले.

