कॉमनवेल्थ गेममध्ये कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी देशाचे नेतृत्व करावे : निलेश कुलकर्णी

कॉमनवेल्थ गेममध्ये कल्याण डोंबिवलीतील खेळाडूंनी देशाचे नेतृत्व करावे : निलेश कुलकर्णी

Published on

''कॉमनवेल्थ''मध्ये कल्याण-डोंबिवलीतील खेळाडूंनी देशाचे नेतृत्व करावे : नीलेश कुलकर्णी
क्रीडा, साहित्य क्षेत्रात डोंबिवलीची आघाडी कायम राखण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : कल्याण डोंबिवली शहरातून क्रिकेटपटू मोठ्या संख्येने घडले आणि त्यांनी देशाचे यशस्वीरित्या प्रतिनिधित्व केले; मात्र इतर खेळांमध्ये या शहराची वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नाही. २०३० मध्ये गुजरात येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत शहरातील खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व केल्यास, ती शहरासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट ठरेल, अशी आशा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीवीर नीलेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. आगरी युथ फोरमच्या वतीने आयोजित केलेल्या २१ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या महोत्सवाचे उद्घाटन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नीलेश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडासंकुलात १९ डिसेंबरपर्यंत आयोजित केलेल्या या महोत्सवात साहित्य, संस्कृती, मनोरंजन आणि विविध विषयांवर मार्गदर्शनपर कार्यक्रम होणार आहेत. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री जगन्नाथ पाटील, केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, महापालिका सचिव किशोर शेळके, संघर्ष समितीचे सचिव चंद्रकांत पाटील, भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, २१ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे अध्यक्ष शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलकर्णी म्हणाले, मी डोंबिवलीतून देशाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला क्रिकेट खेळाडू ठरलो, त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि तुषार देशपांडे यांनी शहराचा मान वाढवला. परंतु क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांनाही शहरातून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. आगरी महोत्सवाच्या माध्यमातून कला आणि शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन मिळत आहे, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील खेळाला महत्त्व देत असल्याने, २०३० च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कल्याण-डोंबिवलीतील खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले की, क्रिकेट व्यतिरिक्त ऑलिम्पिक स्पोर्ट्समध्ये देखील डोंबिवलीचे नाव उंचीवर गेले पाहिजे. यासाठी जी मदत लागेल, ती करण्यास ते तयार आहेत. खेळ आपल्याला आयुष्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो आणि त्यातून माघार न घेण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
------------------
स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचा मानस
रवींद्र चव्हाण म्हणाले, मध्यमवर्गीय खेळाडूंना सुविधा मिळत नाही. आणि मग ते या क्षेत्रापासून दूरावतात. एखाद्या खेळाडूसाठी एमसीएमध्ये निवड होणे कठीण गोष्ट असते. अनेक खेळाडू संधीच्या अतिशय जवळ जातात पण त्यांची निवड होत नाही. त्यामुळे त्यांना पुढे कसे जाता येईल, या पध्दतीने आम्ही विचार करत आहोत. या शहरात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी तयार करण्याचा मानस आहे. त्याला येत्या काळात यश येईल, अशी अपेक्षा आहे. खेळ व त्यावर आधारित करिअरच्या संधी चालत येतात. येत्या काळात या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com