पांढरा कांदा लागवडीला सुरुवात!
पांढरा कांदा लागवडीला सुरुवात!
पाऊस लांबल्याने १५ दिवस उशीर; शेतकऱ्यांना हाताला मिळाले काम
चोंढी, ता. १३ (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पांढऱ्या कांद्याच्या लागवडीला उत्साहाने सुरुवात झाली आहे. यामुळे परिसरातील अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे, मात्र यंदा पावसाने अधिक काळ मुक्काम केल्यामुळे कांद्याची लागवड सुमारे १५ दिवस लांबणीवर गेली आहे. लागवडीची कामे सुरू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सध्या या कामात पूर्णपणे मग्न झाले आहेत.
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याला त्याच्या चविष्टपणा आणि औषधी गुणधर्मांमुळे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आणि राज्यांतून मागणी असते. अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील कांद्याला विशेष पसंती असून, येथील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील कांद्याला पर्यटक आणि स्थानिक लोकांकडून मोठी मागणी आहे.
चोंढी, कार्ले, खंडाळे, नेहुली, वाडगांव, मुळे, खानाव, उसर आदी परिसरातील गावांमध्ये शेतकरी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतात, ज्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळते.
साधारणपणे भातकापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांदा लागवडीला सुरुवात होते. यंदा जिल्ह्यात पाऊस जास्त काळ राहिल्याने लागवड लांबली. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवडीला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, यावर्षी लागवड १५ दिवस उशिरा सुरू झाली आहे. काही शेतकऱ्यांनी १५ गुंठे, काहींनी एक ते दोन एकर, तर काहींनी अगदी दोन ते तीन गुंठे क्षेत्रामध्ये, तसेच घराच्या बाजूला परसबाग म्हणून कांद्याची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. या लागवडीमुळे परिसरातील अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांदा तयार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कांदा काढणीपासून माळा तयार करणे आदी कामे या कालावधीत होणार आहेत. यातून महिलांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
महिलांना मिळणार रोजगार
कांदा लागवडीच्या या कामातून करोडो रुपयांची उलाढाल होते. अंदाजानुसार, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांदा तयार होण्याची शक्यता आहे. या काळात कांदा काढणे, तसेच त्याच्या माळा तयार करणे आदी कामे मोठ्या प्रमाणावर चालणार आहेत. यामुळे परिसरातील महिलांना मोठा रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांचे मत :
कांदा लागवड यंदा १५ दिवस उशिरा सुरू झाली आहे. लागवडीला सुरुवात झाली आहे. शेतकरी लागवडीच्या कामाला लागला आहे. कांदा लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. कार्लेसह आजूबाजूच्या गावातील असंख्य शेतकरी भातशेतीसह पांढऱ्या कांद्याची लागवड करतात. कांदा लागवडीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन मिळत आहे. अलिबागमधील पांढरा कांदा चविष्ट व आरोग्यवर्धक आहे. त्यामुळे या कांद्याला मागणी प्रचंड आहे.
- सतिश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी.

