बाणगंगा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी समितीचे गठन.
बाणगंगा नदीच्या संवर्धनाचा निर्धार
प्रदूषणमुक्तीच्या उपाययोजनांसाठी समितीचे गठन
तारापूर, ता. १३ (बातमीदार)ः औद्योगिक क्षेत्राजवळील पास्थळ, परनाळी येथून वाहणाऱ्या तसेच धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली बाणगंगा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. या नदीला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी समितीचे गठन करण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्राजवळील पास्थळ, परनाळी, कुरगाव परिसरातून वाहणारी बाणगंगा दांडी खाडी मार्गे अरबी समुद्राला मिळते. या नदीला धार्मिक महत्त्व असल्याने पास्थळ येथील घाटावर विविध विधी केले जातात, मात्र सकाही वर्षांपासून पात्रात सोडण्यात येणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. याच अनुषंगाने नदी संवर्धनासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रवीण संखे यांनी याबाबतचा पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार बाणगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत नदी प्रदूषणमुक्तीसाठी पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप-अभियंता, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आणि बाबा ऑटोमिक रिसर्च सेंटरचे प्रतिनिधी अशा आठ जणांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती १५ दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
--------------------------------
बैठकीतील मुद्दे
- नदीपात्राची खोली वाढवावी.
- प्रदूषित पाणी नदीपात्रात कुरगाव स्मशानभूमीजवळ सोडण्यात यावे.
- धार्मिक विधीच्या वेळी तयार होणारा कचरा, निर्माल्य विल्हेवाट लावावे.

