वसईत विकासाची गंगा
वसईत विकासाची गंगा
वीज, पाणी, उड्डाणपूल, आरोग्याशी संबंधित कामे
वसई, ता. १३ (बातमीदार) : वसईतील विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी शासन आणि प्रशासकीय स्तरावर वेगाने प्रयत्न सुरू आहेत. त्यात वीज, पाणी, उड्डाणपूल, आरोग्याशी संबंधित कामांचा समावेश आहे. वसईतील पाणीपुरवठा, रस्ते विस्तारीकरण, मेट्रो व आरोग्य केंद्राशी निगडित प्रकल्प तातडीने मार्गी लागावेत यासाठी स्थानिक आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
वसईत एमएमआरडीएच्या माध्यमातून नवे उड्डाणपूल बांधले जाणार आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत ४९४ कोटी रुपयांची कामे सुरू झाली आहेत. त्यात जलवाहिनी अंथरणे, पाण्याच्या टाक्या, जीर्ण जलवाहिनी बदलणे अशी कामे केली जात आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी दिली.
वसई-विरार शहरात वीजपुरवठ्यातील तांत्रिक अडचणी दूर करणे व ओव्हरहेड लाइन्स भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. या कामाच्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. नालासोपारा येथे सुसज्ज असे रुग्णालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
वसईत विकासाचे नवे प्रकल्प यावेत, नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित विभागाचे मंत्री यांची भेट घेऊन चर्चा केली. लोकांशी संबंधित अनेक कामे सुरू झाली आहेत. त्यात हॉस्पिटल, रस्ते, वीज, पाणी व अन्य कामांचा समावेश आहे. भविष्यात पर्यटन विकास, मच्छीमारांसाठी योजना, उड्डाणपूल यासह विविध कामांसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
- स्नेहा दुबे-पंडित, स्थानिक आमदार
वसई-विरारमधील कामे
- १, २११ कोटींचा वीज भूमिगत प्रकल्पाला मंजुरी
- १०० खाटांचे नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी
- भाईंदर-वसई-विरार मेट्रोचा विस्तार
- नवीन २० एस. टी. बसेस दाखल
- विरार ग्रामीण रुग्णालय १०० खाटांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव

