भिवंडी बायपास होणार सुसाट

भिवंडी बायपास होणार सुसाट

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ ः मुंबई-नाशिक मार्गावरील भिवंडी बायपास मार्ग मार्च २०२६ पर्यंत मार्गी लागणार असल्याची माहिती विधान परिषदेत देण्यात आली आहे. या मार्गावरील कामांमुळे ठाणे-भिवंडी हा ४५ मिनिटांचा रस्ता कोंडीतून पार करण्यासाठी दीड ते तीन तास लागत होते; मात्र बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास चक्क सात ते दहा मिनिटांवर येणार असून पुढे समृद्धी महामार्गामुळे तो सुसाट होणार आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून वादात सापडला आहे. निकृष्ट रस्ता, खड्ड्यांमुळे हा मार्ग अपघातप्रवण क्षेत्र बनले. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणारा हा मार्ग कोंडीत सापडल्याने २०१८ मध्ये ठाणे-भिवंडी बायपास मार्गाचे काम हाती घेण्यात आले. ठाणे-भिवंडी बायपास या मुंबई-नाशिक महामार्गावरील सुमारे २३.८ किमीच्या या रस्त्यावर सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत ठेकेदार नेमून काम सुरू केले; पण कोरोनामध्ये या प्रकल्पाला ब्रेक लागला. त्यानंतर या मार्गावर होणाऱ्या कोंडीमुळे अखेर २०२२ मध्ये हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आले; मात्र या कामाची गती मंदावल्याने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे.

संसदेत खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर विधान परिषदेमध्ये हिवाळी अधिवेशनातही एका चर्चेदरम्यान हा विषय आला. अमोल मिटकरी यांनी समृद्धी महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आणले. ही कोंडी टाळण्यासाठी बायपास रस्त्यांच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी हा प्रकल्प आता मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली.

कोराेनानंतर २०२१ मध्ये हा मार्ग एनएचएआयकडून एमएमआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आले; मात्र या कामासाठी कांदळवन, वनविभाग, तसेच रेल्वेच्या आवश्यक परवानगी मिळवण्यासाठी विलंब झाला. या सर्व मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात २०२२ मध्ये कामाला सुरुवात झाली. आता या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून मार्चपर्यंत ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.

२४ किमीचा रस्ता, चार पूल
ठाणे-भिवंडी बायपास मार्गावर चार पूल असून त्यातील तीन पूल जानेवारीपर्यंत कार्यान्वित होतील. तर रेल्वेखालील क्रॉसिंगसाठी अंतिम नकाशा मान्यतेसाठी रेल्वेकडे पाठवण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच या पुलाचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.

कोंडीची ठिकाणे
मार्गावरील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. साकेत, खारेगाव खाडीपुलांचे बांधकामही पूर्ण झाले आहे; मात्र वडपे आणि ओवळी पुलाचे कामही पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सध्या या मार्गावरून दोन ते अडीच लाख वाहने रोज ये-जा करीत आहेत; पण रस्तेकामामुळे पिंपळास, बॉम्बे ढाबा, माणकोली, येवई, वडपे आणि ओवळी आदी ठिकाणी कोंडी होते. त्याचा परिणाम पुढे ठाण्यापर्यंत जाणवतो.

वेग वाढणार
समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण आहे; पण ठाणे ते भिवंडी मार्ग रखडल्यामुळे प्रवाशांना सध्या रोज ४५ मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते अडीच तास खर्च करावा लागतो. बायपास मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास अवघ्या दहा मिनिटांत भिवंडी आणि पुढे ‘समृद्धी’वरून नाशिक झटपट गाठणे शक्य होणार आहे.

मुदतीवर मुदत
या मार्गाच्या निर्मिती प्रकल्पाचा सुरुवातीला खर्च एक हजार १८३ कोटी आणि मुदत २०२१ पर्यंत होती. त्यानंतर सप्टेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली. पुन्हा मुदत फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाढवली. आता मार्च २०२६ची मुदत देण्यात आली असून हा मुहूर्त साधल्यास पावसाळ्यात ठाणे, भिवंडीला जोडणाऱ्या शहरांनाही कोंडीतून दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

असा आहे महामार्ग...
- एकूण आठ मुख्य व चार सेवा रस्ते
- वालशिंद, सोनाळे, येवई, खारेगावसह १० ठिकाणी अंडरपास
- वडपे, ओवळी येथे उड्डाणपूल, कशेळी व कळवा खाडीपूल, तर पिंपळास रेल्वे पूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com