वाहतूक पोलिसांनी लावला महागड्या वाहनांच्या चोरीचा छडा
वाहतूक पोलिसांकडून चोरीच्या महागड्या वाहनांचा छडा
ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रभावी तपासणी मोहिमेमुळे तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या १५ चोरीच्या वाहनांचा छडा लागला आहे. या वाहनांमध्ये आलिशान ऑडी कार आणि महागडी हार्ले डेव्हिडसन दुचाकी यांसारख्या वाहनांचा समावेश आहे. वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ही उल्लेखनीय कामगिरी करत, पोलिस दप्तरी दाखल असलेल्या अनेक प्रलंबित चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मदत केली आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरसह एकूण आठ शहरे येतात. या क्षेत्रातील ३५ पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या १८ उपवाहतूक विभागांनी वाहतुकीचे नियमन आणि वाहन तपासणीदरम्यान ही कामगिरी केली. यावर्षी १ जानेवारी ते ९ डिसेंबर या कालावधीत केलेल्या तपासणीत एक आलिशान ऑडी कार, महागडी हार्ले डेव्हिडसन दुचाकी तसेच १० दुचाकी आणि चार ऑटो रिक्षा अशी चोरीची वाहने पकडण्यात यश आले आहे.
दरम्यान, उल्हासनगर क्षेत्रात नुकतीच तपासणी सुरू असताना हार्ले डेव्हिडसन ही महागडी दुचाकी हस्तगत करण्यात आली. वाहतूक पोलिस अंमलदार विष्णू शिंदे आणि वाहतूक वार्डन नरेश दळवी हे कर्तव्य बजावत असताना, नंबर प्लेट नसलेल्या मोटारसायकलवरून तीन इसम येत असल्याचे त्यांना आढळले. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असताना, त्या त्रिकुटाने मोटारसायकल पोलिसांच्या दिशेने ढकलून पळ काढला.
---------------------
वाहतुकीचे नियमन करीत असताना वाहतूक पोलिस कर्मचारी वाहनांसंबंधित कागदपत्रांचीही मागणी करतात. अनेकदा पोलिसांची ही सर्वंकष तपासणी वाहनचालकांना डोकेदुखी ठरून जाचक वाटत असते, मात्र प्रत्येक वाहनचालकाने हेल्मेट तसेच योग्य परवान्यासह आपण चालवित असलेल्या वाहनांशी संबंधित कागदपत्रे सोबत बाळगणे गरजेचे आहे, जेणेकरून तपासणीदरम्यान गैरसोईचे ठरणार नाही.
- पंकज शिरसाट, पोलिस उपआयुक्त, ठाणे शहर वाहतूक विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

