डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा गुलाबी रस्ता

डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा गुलाबी रस्ता

Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाची समस्या ही वर्षानुवर्षे जशीच्या तशी आहे. २०२० मध्ये प्रदूषणामुळे येथील रस्त्याला गुलाबी रंग आला होता. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांची पाहणी करून प्रदूषण रोखा, नाहीतर कंपनीला टाळे लावा, असे आदेशही दिले होते, मात्र पुढे त्यावर ठोस अशी कृती झाली नाही. त्यानंतरही हिरवा पाऊस, निळे रस्ते, वाहनांवर रासायनिक ठिपके दिसून आले. २०२० ची पुनरावृत्ती डोंबिवलीत आता पुन्हा दिसून आली आहे. फेज २ मधील रस्ते हे गुलाबी झाले असून, नाल्यातील पाणीदेखील गुलाबी झालेले शनिवारी (ता. १३) पाहायला मिळाले.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायू, तसेच रसायनमिश्रीत पाण्यामुळे निवासी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रासायनिक प्रदूषणामुळे एमआयडीसीत हिरवा, नारंगी पाऊस, त्यानंतर रसायनामुळे गुलाबी झालेले रस्ते यापूर्वी पाहिले आहेत. या रसायनांच्या उग्र वासामुळे डोकेदुखी, डोळे चुरचुरणे, श्वास घेण्यास अडचणी आदी गोष्टींचा त्रास नागरिकांना सातत्याने भेडसावतो. २०२२ मध्ये राज्य सरकारने डोंबिवलीतील १५६ रासायनिक कारखाने पाताळगंगा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कामा संघटनेने विरोध केला आणि हे घोंगडे अद्याप भिजत पडलेले आहे.

डोंबिवली एमआयडीसी फेज २ मधील रस्ते हे गुलाबी रंगाचे शनिवारी दिसून आले. काही कंपन्यांचे कर्मचारी हा रस्ता साफ करत होते. तसेच रस्ता धुवून काढत होते. त्यांना याविषयी विचारणा केली असता, ते म्हणाले की, रस्त्याच्या कडेला गटाराचे काम सुरू असून, या गटारातील गाळ, कचरा हा रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला होता. हा गाळ सुकल्यानंतर त्यातील रासायनिक पावडर ही रस्त्यावर, तसेच आजूबाजूच्या कंपनीत पसरली आहे, मात्र अंतर्गत पूर्ण रस्त्यावर रसायनमिश्रित गुलाबी पावडरचा थर पडलेला असून, हा नक्की कोठून आला? नाल्यातील ठरावीक गाळ गुलाबी रंगाचा कसा, असे काही प्रश्न अनुत्तरित आहेत.

पाच वर्षांपूर्वीही घटना
२०२० मध्ये रस्त्यांना गुलाबी रंग आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमआयडीसी परिसराची पाहणी करून प्रदूषण रोखा, नाहीतर कंपनीला टाळे लावा, असे आदेश दिले होते. घातक उद्योगांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर १५६ कारखाने अतिधोकादायक आणि धोकादायक परिस्थितीत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार हे कारखाने इतरत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्य सरकारने जाहीर केले होते.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या या नागरिकांसाठी धोकादायक आहेत. त्या हलवण्याचा आदेश निघाला आहे, मात्र सरकारच या आदेशाची अंमलबजावणी करत नाही. येथे वारंवार गुलाबी अथवा निळे रस्ते हे निदर्शनास येत असतात. कामा संघटना याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते.
- शशिकांत कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते

प्रदूषणाविषयी आम्ही २५-३० वर्षे लढा देतोय. दर दोन-तीन महिन्यांनी अशा दुर्घटना वारंवार घडतात. नेहमी आम्हाला आश्वासन मिळते, मात्र येथील रासायनिक कंपन्या स्थलांतरित झाल्या नाहीत. यावर ठोस अंमलबजावणी झाली नाही, तर मोठे आंदोलन करून अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडायची वेळ आमच्यावर आली आहे.
- राजू नलावडे, सामाजिक कार्यकर्ते

हा रोडामाईन कलर आहे. येथे गटाराचे काम करण्यात आले आहे. त्या कामादरम्यान बाहेर काढण्यात आलेल्या मातीमध्ये तो रंग मिसळत होता. हा गाळ आता सुकल्यामुळे तो रस्त्यावर पसरला आहे. रस्ता साफ करून हा गाळ एकत्र करून तळोजा येथे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड येथे शास्त्रीयरीत्या विल्हेवाटीसाठी पाठवण्यात येणार आहे.
- देवेन सोनी, अध्यक्ष, समायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र, कामा संघटना

एमआयडीसीकडून नालासफाईचे काम सुरू आहे. त्यातील गाळ काही प्रमाणात आल्याने त्यावर काही कंपन्यांनी पाणी मारल्यामुळे तो रस्त्यावर पसरला. याविषयी एमआयडीसीला कळवले असून, रस्ता साफ करण्याचे काम सुरू झाले आहे.
- उपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com