कामगारांचे घरकुलाचे स्वप्न वादात
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १३ : घणसोली येथे हजारो माथाडी कामगार राहत असलेली सिडकोनिर्मित सोसायटी गेल्या अनेक वर्षांपासून मोडकळीस आली आहे. या सोसायटीच्या पुनर्विकासासाठी या आधीच्या विकसकाने पाठ फिरवल्यामुळे दुसरा विकसक नियुक्त करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे, मात्र काही राजकीय नेत्याकडून मंत्र्यांमार्फत विकासाच्या कामात अडथळा आणला जात आणून नवी मुंबई महापालिकादेखील खतपाणी घालत आहे. अशा मृत्यूच्या कात्रीत सापडलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनी प्रशासन आणि राजकीय नेत्यांविरोधात मुंडण आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घणसोली येथे सिडकोने नवी मुंबई शहराच्या निर्मितीनंतर माथाडी कामगारांसाठी लहान आकाराची सुमारे साडेतीन हजार घरे तयार केली. आज या घरांची अवस्था खराब झाली असून, इमारतींना मोठे तडे गेले आहेत. इमारतींच्या छतावरचे स्लॅब खाली कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे एखादी दुर्दैवी घटना घडण्याआधी पुनर्विकास करण्याचा प्रयत्न कामगारांच्या कुटुंबांकडून सुरू आहे. त्याकरिता एकीकडे महापालिका, सिडको प्रशासनाकडून पुनर्विकासाची परवानगी, तर दुसरीकडे चांगला विकसक निवडण्याच्या कामाला कामगार लागले. या कामात सुरुवातीला एक विकसक नियुक्त करण्यात आला होता.
विकसकाने सांगितल्यानुसार सुमारे ८०० कुटुंबीयांनी घरे रिकामी केली, परंतु विकसकाने घरे रिकामी केलेल्या कुटुंबीयांना आठ महिन्यांचे भाडे दिलेले नाही. अशा परिस्थितीत घर सोडलेले कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत. आपल्या घरांना आणि कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणाऱ्या जुन्या विकसकाने बदलून वेळेवर काम करून देणाऱ्या नवीन विकसक निवडून आणण्यासाठी कामगारांनी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु आता यात राजकीय नेत्यांनी मंत्र्यांमार्फत अडथळा आणला आहे. या इमारतींना २० वर्षे झाली नसल्याचे कारण पुढे करून महापालिकेने धोकादायक असल्याचा प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे, मात्र कामगारांच्या सोसायटीने इमारती धोकादायक झाल्याचे कधीही कोसळतील, असा अहवाल व्हीजेटीआय मुंबई आणि आयआयटी खडकपूर यांच्याकडून आणला आहे, मात्र महापालिका प्रशासन हे दोन्ही अहवालावरून इमारती धोकादायक घोषित करण्यास नकार देत आहे. महापालिकेचे धोकादायक प्रमाणपत्र मिळत नसल्याने पुनर्विकास रखडला आहे.
उद्या मुंडण आंदोलन
सिम्प्लेक्स सोसायटीमध्ये हजारो माथाडी कामगार गेली अनेक वर्षे वास्तव्याला आहेत. या इमारती कधीही कोसळतील, अशी अवस्था आहे. आधीच्या विकसकाने अनेक महिने भाडे दिलेले नाही. महापालिका धोकादायक प्रमाणपत्र देत नाही. अशा परिस्थितीत प्रशासन आणि राजकीय नेत्यांविरोधात माथाडी कामगारांकडून उद्या (ता. १४) मुंडण आंदोलनाचा इशारा दिला आहे.
युडीसीपीआर काय सांगतो?
एखाद्या इमारतीला जरी ३० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ झालेला नसेल, मात्र इमारतीची अवस्था खराब झालेली असेल, इमारतीला तडे आणि स्लॅबला भेगा गेल्या असतील तरीसुद्धा ती इमारत पुनर्विकास करण्यास पात्र ठरते, हे राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या युडीसीपीआर नियमावलीत म्हटल्याचा दावा माथाडी कामगार सोसायटीकडून करण्यात येत आहे.
आम्ही अनेक वर्षे धोकादायक अवस्थेतील इमारतींमध्ये राहत आहोत. आधीच्या विकसकाने गेले आठ महिने भाडे दिलेले नाही. नवी मुंबई महापालिका आमच्या इमारती धोकादायक घोषित करत नाहीत. इमारत कोसळून दुर्घटना घडेल, तेव्हा हे प्रशासन जागे होईल का? अशा प्रशासनाचा आम्ही निषेध करतो.
- संदीप लांबतांबे, अध्यक्ष, श्री गुरुदत्त सोसायटी
घनसोलीची सिम्प्लेक्स सोसायटीच्या इमारतींना अद्याप ३० वर्षे आणि त्याहून अधिक काळ झालेला नाही. या इमारती नियमात बसत नसल्याने त्यांना कोणाच्या मागणीनुसार अतिधोकादायक घोषित करता येत नाही.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
माथाडी कामगारांच्या धोकादायक अवस्थेतील सोसायट्या
- श्री गणेश कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी मर्यादित
- श्री गुरुदेव दत्त को-ऑप हौसिंग सोसायटी मर्यादित
- ओम साईधाम गृहनिर्माण संस्था मर्यादित
- कै. आमदार अण्णासाहेब पाटील को-ऑप हौसिंग सोसायटी मर्यादित
- श्री हनुमान को-ऑप हौसिंग सोसायटी मर्यादित
- कै. शिवाजीराव पाटील को-ऑप हौसिंग सोसायटी मर्यादित
- माऊली कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी मर्यादित
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

