आंब्याला विम्याचे कवच

आंब्याला विम्याचे कवच

Published on

आंब्याला विम्याचे कवच
१५ डिसेंबरपूर्वी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

वाणगाव, ता. १३ (बातमीदार) : बदलते हवामान, अवकाळी पाऊस, तापमानात बदल याचा विपरीत परिणाम आंबा पिकावर होतो. तसेच मोहोर गळणे, मोहोर करपणे, फळगळ होणे अशा समस्या सातत्याने जाणवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे उत्पादन जाऊन पूर्ण हंगाम वाया जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या या आर्थिक नुकसानीला आळा बसविण्यासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा फळपीक विमा योजना शासनामार्फत राबविण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आंबा बागेचा विमा १५ डिसेंबर २०२५ पूर्वी उतरवून आपली आंबा बाग विमा संरक्षित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.

पालघर जिल्ह्यासाठी आंबा आणि काजू या फळपिकांसाठी यापूर्वी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत होती, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना फळपीक विमा पोर्टलवर सहभाग नोंदविता येत नव्हता. या अडचणी लक्षात घेऊन शासनाने केंद्र शासनाकडे मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर केला. त्याला केंद्र शासनाने अनुमती दिल्याने आता जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना १५ डिसेंबर २०२५ पर्यंत फळपीक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.

हवामानातील अनिश्चिततेमुळे बागायती शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. या योजनेत सहभागी झाल्यास जोखमीपासून संरक्षण मिळू शकते. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मुदत वाढीचा लाभ घेऊन मुदतीपूर्वी फळपीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले फळपीक विमा संरक्षित करावे.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर

Marathi News Esakal
www.esakal.com