श्रीवर्धनमध्ये आरोग्य सेवेचे तीनतेरा
श्रीवर्धनमध्ये आरोग्यसेवेचे तीनतेरा
उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोगसेवा अपुरी; तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे गैरसोय
श्रीवर्धन, ता. १३ (बातमीदार) : राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना आणि स्वतः महिला व बालकल्याण मंत्री या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार असतानाही, श्रीवर्धन शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगसेवा अपुऱ्या असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. दरमहा ३५ पेक्षा अधिक प्रसूती होणाऱ्या या रुग्णालयात आवश्यक तज्ज्ञांची कमतरता असून, त्याचा थेट फटका ग्रामीण भागातील महिला रुग्णांना बसत आहे.
रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ कार्यरत असले तरी तपासणी, उपचार व मार्गदर्शनाच्या सुविधा मर्यादित असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे रुग्णालयात आधुनिक सोनोग्राफी यंत्र उपलब्ध असतानाही रेडिओलॉजिस्ट किंवा सोनोलॉजिस्ट नसल्यामुळे गर्भवती महिलांची अत्यावश्यक तपासणी वेळेवर होत नाही. परिणामी अनेक महिलांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या ग्रामीण कुटुंबांवर अतिरिक्त खर्चाचा मोठा भार पडत आहे. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील शंभरहून अधिक गावांतील महिला या उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून आहेत. सुरक्षित मातृत्वासाठी शासनाच्या विविध योजनांवर विश्वास ठेवून येणाऱ्या महिलांना प्रत्यक्षात अपेक्षित आरोग्यसेवा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वेळेवर सोनोग्राफी व तज्ज्ञ तपासणी न झाल्यास गर्भावस्थेतील गुंतागुंत वाढण्याचा धोका असल्याची भीतीही आरोग्य क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. याशिवाय, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पद सध्या रिक्त आहे. तात्पुरत्या स्वरूपात डॉ. कौस्तुभ केळस्कर यांच्याकडे प्रशासकीय जबाबदारी सोपविण्यात आली असून, त्यांच्याकडे म्हसळा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा अतिरिक्त भारही देण्यात आला आहे. मर्यादित मनुष्यबळातही येथील डॉक्टर व कर्मचारी प्रामाणिकपणे रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करत असले तरी कायमस्वरूपी उपाययोजना होणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
.............
रिक्त पदांबाबत शासनाकडे अहवाल
सध्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ कार्यरत असले तरी ही पदे कायमस्वरूपी भरावीत, अशी मागणी होत आहे. एकीकडे महिलांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबविल्या जात असताना, दुसरीकडे स्त्रीरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधीक्षक अशी महत्त्वाची पदे रिक्त राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे. दरम्यान, श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांबाबतचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असून, याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. ही पदे शासनस्तरावरूनच भरली जातात, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

