दगडी “जात” आज नामशेषाच्या वाटेवर…

दगडी “जात” आज नामशेषाच्या वाटेवर…

Published on

‘दगडी जातं’ नामशेषाच्या वाटेवर
वडार समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण

महेश भोये
तलासरी, ता. १३ : ग्रामीण आणि आदिवासी खेड्या-पाड्यात ‘दगडी जातं’ हे केवळ धान्य दळण्याचे साधन नाही, तर पहाटेची चाहूल, घराघरातील गजबज, स्त्रियांच्या ओव्या, श्रम आणि संस्कृती यांचा अतूट संगम आहे. पहाटे गावभर ऐकू येणारी जात्याची घरघर हीच दिवसाची सुरुवात असते. कोंबड्याच्या बांगेला, गोठ्यातील गाय-खिल्लारांच्या स्वरांना आणि दवबिंदू झळकणाऱ्या प्रकृतीसोबत जात्याची लय जणू निसर्गालाही जागवत असते, परंतु आज हे सारे दृश्य विस्मृतीत जात आहे. ‘दगडी जातं‘ आता कालबाह्य होत असून, अंतिम घटका मोजत आहे.
पूर्वीच्या काळी गिरण नव्हती, पीठ, सत्व, धान्य हे सर्व घरच्या घरीच जात्यावर दळले जायचे. दगडाचे दोन गोल, मध्यभागी छिद्र आणि फिरवण्यासाठी ‘नामकी’ ही साधी, पण अचूक रचना आजही कौतुकास्पद वाटते. जाड-बारीक पीठ बायकाच हाताने ठरवायच्या. ताजे पीठ, ताज्या भाकऱ्या ही ग्रामीण चवीची खरी ओळख. जात्यावर बसताच ओव्या आपोआप मुखातून उमटत असतात. संत जनाबाईंचे जात्यावरील नाते तर इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. जात्याशी संबंधित ओव्या, गाणी आणि लोककथा आजही संस्कृतीचा महत्त्वाचा ठेवा म्हणून आहेत.
दगडी जातं तयार करणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण काम आहे. वडार-पाथरवट समाजातील वृद्ध कारागीर काळ्या दगडाला हातोडा आणि चिनीने घाव मारत सुबक आकार देऊन जातं तयार करतात. आजही महामार्गावर, यात्रेत, काही गावांत ते विक्रीसाठी दिसतात.
छोट्या जात्याचा भाव प्रति नग ५०० रुपयांपासून, तर मोठ्या जात्याचा भाव प्रति नग १,००० ते २,००० रुपये आहे. तंत्रयुगाच्या काळात दगडी जातं हरवत चालले आहे. घराघरात मिक्सर-ग्राइंडर, सर्वत्र उपलब्ध गिरण्या, बाजारात रेडिमेड गव्हाचे, तांदळाचे, ज्वारीचे पीठ, शिक्षण, नोकरीसाठी महिलांचा घराबाहेर पडण्याचा वाढता ओघ, वेगवान जीवनशैली यामुळे एक तासाचे दळण आता पाच मिनिटांत करण्याकडे लोकांचा ओढा आहे. त्यामुळे गावातून जातं हळूहळू अदृश्य होत असल्याचे वडार समाजाकडून सांगण्यात येत आहे.


दगडी जातं हे पिढ्यानपिढ्या टिकतं, पण आता या जात्याची विक्री कमी झाली आहे. सध्या सर्वत्र आधुनिक पीठ गिरण्या, मिक्सर इत्यादी आधुनिक यंत्रांचा वापर केला जातो. बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या उपकरणांमुळे आमच्यासारख्या वडार समाजाच्या हाताला कामच उरले नाही. त्यामुळे आमची कला अंतिम घटका मोजू लागली आहे. त्याचबरोबर पोटापाण्याच्याही प्रश्न निर्माण झाला आहे.
-महेंद्र वडार, पाथरवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com