महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांना १३ वर्षांनंतर न्याय
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांना १३ वर्षांनंतर न्याय
२,२८५ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीचा मार्ग मोकळा; उरणसह जिल्ह्यात आनंदोत्सव
उरण, ता. १३ (वार्ताहर) : महाराष्ट्र वीज मंडळातील कंत्राटी कामगारांच्या दीर्घ संघर्षाला अखेर यश आले आहे. तब्बल १३ वर्षांच्या लढ्यानंतर औद्योगिक न्यायालयाने राज्यातील २,२८५ कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच २०१२ पासूनची वेतन तफावत भरून काढण्याचे स्पष्ट निर्देशही वीज मंडळाला देण्यात आले आहेत.
या ऐतिहासिक निर्णयानंतर उरण तालुक्यासह जिल्ह्यातील वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अनेक ठिकाणी कामगारांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. दीर्घकाळ चाललेल्या अनिश्चिततेनंतर मिळालेल्या या न्यायामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०१२ पासून कायम नोकरीच्या मागणीसाठी आंदोलन, निवेदने व न्यायालयीन लढा सुरू होता. या काळात काही कामगारांचे निधन झाले, तर काही निवृत्त झाले, मात्र न्यायालयाने मयत व निवृत्त कामगारांच्या कुटुंबीयांनाही भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
चौकट
कामगारांना दिलासा
या निर्णयामुळे कामगारांना निश्चित वेतन, पीएफ, वैद्यकीय सुविधा व नोकरीतील स्थैर्य मिळणार असून, हा निर्णय कंत्राटी कामगारांसाठी मैलाचा दगड ठरत आहे. न्यायालयीन आदेशानुसार वीज मंडळाने लवकरच कायमस्वरूपी नेमणुका प्रक्रिया सुरू करणे, २०१२ पासूनची वेतन तफावत अदा करण्याची योजना जाहीर करणे, मयत/निवृत्त कामगारांच्या कुटुंबीयांना भरपाई देणे या सर्व प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत.

