३४ वर्षांनंतर आरोपीची सुटका
३४ वर्षांनंतर अखेर सुटका
तलासरी आश्रम हल्ल्याप्रकरणी न्यायालयाचा निकाल
तलासरी, ता. १३ (बातमीदार) ः तालुक्यातील विश्व हिंदू परिषदेच्या वनवासी कल्याण केंद्र आश्रमावर ऑगस्ट १९९१ मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणात ३४ वर्षांनंतर न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणातील अटकेत असलेल्या एकमेव हयात आरोपी सतवा लाडक्या भगत याला पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवले असून, त्याची सुटका झाली आहे.
१४ ऑगस्ट १९९१ रोजी तलासरी येथील विश्व हिंदू परिषद वनवासी कल्याण केंद्र आश्रमावर डाव्या विचारसरणीच्या सुमारे १५० ते २०० जणांच्या जमावाने दगड व काठ्यांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा आरोप होता. हल्ल्यादरम्यान ‘लाल बवटा जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या हिंसक घटनेत आश्रमाचे तत्कालीन व्यवस्थापक महादेव जयराम जोशी यांना गंभीर दुखापत झाली होती. तसेच आश्रमातील मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली होती. एक रिक्षाही पेटवून देण्यात आली होती.
कार्यवाही बंद
या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या मूळ आरोपपत्रात ३२ आरोपींचा समावेश होता. दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर ७ जानेवारी २००३ रोजी या सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती; मात्र त्यानंतर पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात चार नव्या आरोपींचा समावेश करण्यात आला. या चार आरोपींविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते; मात्र या चारपैकी तीन आरोपींचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाल्याने त्यांच्यावरील कार्यवाही बंद करण्यात आली होती.
पुराव्यांचा अभाव
उर्वरित एकमेव आरोपी सतवा लाडक्या भगत याच्याविरोधात पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. चौधरी इनामदार यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी पूर्वी नोंदवलेल्या साक्षी स्वीकारण्यात आल्या; मात्र नवीन किंवा ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. न्यायालयाने निकाल देताना स्पष्टपणे नमूद केले, की आरोपीविरोधात थेट व विश्वासार्ह पुराव्यांचा अभाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार व गंभीर जखमी साक्षीदार महादेव जोशी, तसेच साक्षीदार शांताराम झोळ हे न्यायालयात आरोपीची ओळख पटवू शकले नाहीत. तसेच आरोपीविरोधात ठोस आरोप करण्यास त्यांनी नकार दिला. या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने निकालात म्हटले आहे, की दिलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीवर गुन्हा सिद्ध होत नाही. त्यामुळे सर्व आरोप रद्द करून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

