अकस्मात मृत्यूचा मुखवटा फाटला;

अकस्मात मृत्यूचा मुखवटा फाटला;

Published on

तीन वर्षांनंतर उलगडला हत्येचा कट
बदलापूरमध्ये पतीसह चार जणांना अटक
बदलापूर, ता. १३ (बातमीदार) ः शहरातील निरजा आंबेरकर यांचा २०२२ मध्ये झालेल्या मृत्यूमागे नैसर्गिक कारण नसून नियोजित हत्या असल्याचा धक्कादायक खुलासा पोलिस तपासात झाला आहे. पती रुपेश आंबेरकर यानेच सर्पमित्राच्या मदतीने विषारी सर्पदंश करवून पत्नीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात पतीसह चार जणांना बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे. १० जुलै २०२२ रोजी काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष निरजा आंबेरकर यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती; मात्र समाजसेवक संजय वानखेडे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ऋषिकेश चाळके याच्या चौकशीतून हा तीन वर्षांपूर्वीचा हत्येचा कट उघडकीस आला.
पोलिस तपासानुसार, रुपेश आंबेरकर याने सर्पमित्र चेतन दुधाने, ऋषिकेश चाळके आणि कुणाल चौधरी यांना सुपारी देऊन पत्नीची हत्या घडवून आणली. १० जुलै २०२२ रोजी रात्री आरोपींनी प्लॅस्टिकच्या बरणीत विषारी साप आणून रुपेश आंबेरकर यांच्या घरातील किचनमध्ये ठेवला. निरजा घरी आल्यानंतर पायाची मालिश करण्यासाठी तीन लोक बोलावले असल्याचे सांगत या बहाण्याने नीरजा यांना हॉलमध्ये झोपवण्यात आले. त्या वेळी सर्पमित्र चेतन दुधाने याने साप गोणीतून काढून ऋषिकेश चाळके याच्या हातात दिला. त्यानंतर चाळके याने निरजा यांच्या डाव्या पायाच्या घोट्याजवळ तीन वेळा विषारी सर्पदंश करून त्यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. विशेष म्हणजे, विषारी सर्पदंश असूनही बदलापूर येथील शासकीय रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालात सर्पदंशाचा उल्लेख नसल्याने आता शवविच्छेदनाचा अहवाल देणारे डॉक्टरदेखील संशयाच्या फेऱ्यात आले आहेत.
---
कठोर शिक्षा व्हावी
निरजा आंबेरकर यांच्या मैत्रीण मनीषा आंबेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितले, की निरजाच्या मृत्यूनंतर अवघ्या महिन्याभरातच तिच्या पतीने दुसरे लग्न केल्याने आम्हाला तेव्हाच संशय आला होता; मात्र हा सर्पदंश इतक्या नियोजित पद्धतीने घडवून आणण्यात आला असेल, याची कल्पनाही नव्हती. तीन वर्षांनंतर तरी सत्य समोर आले, याचे समाधान आहे; पण निरजाला न्याय मिळण्यासाठी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे.
----
भाजपचा पदाधिकारी
या हत्येप्रकरणातील आरोपी सर्पमित्र चेतन दुधाने हा भाजपचा पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुधाने याने प्रवेश केला होता. त्याला शहर पदाधिकारीपद देण्यात आले. २०२२ मध्ये गुन्हा घडला तेव्हा तो भाजपमध्ये नव्हता, तरी पक्षप्रवेशाच्या वेळी एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमीची तपासणी न झाल्याने, दुधाने यांच्या प्रवेशाने आता पक्षाच्या प्रतिमेवरही विपरीत परिणाम झाल्याची चर्चा सुरू आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com