बालकुमार मराठी साहित्य संमेलन उत्साहात
बालकुमार मराठी साहित्य संमेलन उत्साहात
कुमुद विद्यामंदिर देवनार आयोजन
मुंबई, ता. १३ : आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची खरा तो एकची धर्म ही शिकवण अनुसरायला हवी, असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी देवनार येथे आयोजित ‘बालकुमार मराठी साहित्य संमेलना’त अध्यक्षपदावरून बोलताना केले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि देवनार येथील कुमुद विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबद्दल मौलिक विचार मांडले. कोषाध्यक्ष आनंद बिर्जे यांनी मंगेश पाडगावकरांची कविता सादर करून साहित्य मनोरंजनाबरोबर प्रबोधन करते, असे सांगितले. साहित्य शाखेच्या कार्यवाह प्रा. प्रतिभा सराफ यांनी प्रास्तविकात साहित्य संघाच्या कार्याचा आढावा घेतला.
कुमुद मेमोरियल फंडच्या अध्यक्ष मीना पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी गायकवाड यांनी स्वागत करताना शाळेच्या उपक्रमशीलतेबद्दल माहिती दिली. ‘नोकरीच्या मागे न लागता सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात उतरावे’ असे संमेलनाच्या उद्घाटक अलबत्या गलबत्या फेम अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी सांगितले.
सकाळी ९ वाजता पुंडपाळ, प्रा. प्रतिभा सराफ, समन्वयक एकनाथ आव्हाड, प्रा. प्रतिभा बिस्वास यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने संमेलनाची सुरुवात झाली. या वेळी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात ग्रंथदिडी काढण्यात आली. त्यानंतरच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमा पूजनाने संमेलनाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
दिवसभराच्या संमेलनाला मुंबई मराठी साहित्य संघातर्फे प्रा. सुहासिनी कीर्तिकर, सावित्री हेगडे, मीनाक्षी जयकर, अरुण जोशी, प्रा. रजनी कुलकर्णी, शाळेचे विश्वस्त महादेव कोळी, विलास कांबळे, पर्यवेक्षिका मनीषा मोरे इ. मान्यवरांसह विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आंतरशालेय कथाकथन
दुसऱ्या सत्रात ‘श्यामशी आई’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात ‘श्याम’ या बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता शर्व गाडगीळ याची विद्यार्थ्यांनी घेतलेली मुलाखत, ज्येष्ठ कथाकथनकार मेघना साने व ज्येष्ठ कवी प्रथमेश पाठक यांच्या अध्यक्षतेखाली आंतरशालेय कथाकथन व कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

