अग्निशमन दलाकडून कंत्राटात फेरफार
अग्निशमन दलाकडून कंत्राटात फेरफार
प्रस्ताव महानगरपालिकेच्या प्रशासकांकडे सादर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबईतील उंच इमारतींमध्ये अग्निशमन व बचावकार्य अधिक प्रभावीपणे करता यावे, यासाठी मुंबई अग्निशमन दलाकडून प्रस्तावित ४० मीटर उंचीच्या टर्न टेबल लॅडरच्या खरेदी व सर्वसमावेशक सेवा-परिरक्षण कंत्राटात फेरफार करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या प्रशासकांकडे सादर करण्यात आला आहे.
महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम ६१ (के) अन्वये नागरिकांचे प्राण व मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी मुंबई अग्निशमन दलावर आहे. या कर्तव्याच्या अंमलबजावणीसाठी शहरातील सहा प्रादेशिक समादेश केंद्रांच्या अधिपत्याखाली ३५ अग्निशमन केंद्र, १९ छोटी अग्निशमन केंद्रे व २५९ पेक्षा अधिक वाहनांचा ताफा कार्यरत आहे.
सध्या अग्निशमन दलाकडे ३७ मीटर उंचीचे जर्मनी बनावटीचे ‘मॅगीरस’ टर्न टेबल लॅडर वाहन उपलब्ध आहे. हे वाहन २००३ मध्ये खरेदी करण्यात आले असून, गेली १८ वर्षे सतत वापरात आहे, मात्र या वाहनाचे १५ वर्षांचे सेवा आयुष्यमान संपुष्टात आले असून, वारंवार बिघाड होत असल्याने तसेच सुटे भाग उपलब्ध न झाल्याने त्याचा वापर अडचणीचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, या वाहनाच्या जागी ४० मीटर उंचीचे नवीन टर्न टेबल लॅडर वाहन दोन वर्षांच्या हमीसह व १३ वर्षांच्या सर्वसमावेशक सेवा-परिरक्षण कंत्राटासह खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मे. मॅगीरस जीएमबीएच, जर्मनी यांच्यासोबत सुमारे ९.५२ कोटी रुपयांचे कंत्राट, तर भारतातील अधिकृत वितरक मे. जोसेफ लेसली अॅण्ड के. एलएलपी यांच्यासोबत सुमारे ३.८० कोटी रुपयांचे सेवा-परिरक्षण कंत्राट करण्यास १३ एप्रिल २०२२ रोजी मंजुरी देण्यात आली होती.
दरम्यान, १ एप्रिल २०२३ पासून मे. मॅगीरस जीएमबीएच यांनी भारतातील अधिकृत विक्रेता व सेवा पुरवठादार म्हणून मे. युनिकेअर एमर्जन्सी इक्विपमेंट प्रा. लि. यांची नियुक्ती केल्याचे कळविले आहे. तसेच, युनिकेअर कंपनीला यापूर्वीचे सर्व सेवा कंत्राट स्वीकारण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सेवा कंत्राटात बदल करून ते मे. युनिकेअर एमर्जन्सी इक्विपमेंट प्रा. लि. यांच्या नावे हस्तांतरित करण्याची विनंती करण्यात आली आहे. या बदलामुळे महानगरपालिकेवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार येणार नसला, तरी मूळ कंत्राटामध्ये फेरफार होत असल्याने त्यासाठी अद्ययावत मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार प्रशासक किंवा स्थायी समिती यांची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे यापूर्वी मंजूर ठरावामध्ये फेरफार करून मे. जोसेफ लेसली अॅण्ड के. एलएलपी यांच्या ऐवजी मे. युनिकेअर एमर्जन्सी इक्विपमेंट प्रा. लि. यांच्यासोबत सुधारित कंत्राट करार करण्यास मंजुरी देण्यात यावी, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
उंच शिडीच्या वाहनांची गरज
मुंबई शहरात गेल्या काही दशकांत उंच इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बेटांचे शहर असल्याने आडव्या विस्ताराला मर्यादा असून, शहराची वाढ प्रामुख्याने उंच इमारतींच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे उंच इमारतींमधील आगी व आपत्तीच्या घटनांमध्ये प्रभावी बचावकार्य करण्यासाठी आधुनिक उंच शिडी असलेल्या वाहनांची गरज वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

