अंबरनाथचा ५० वर्षांचा पाणीप्रश्न मार्गी
अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : अंबरनाथकरांना अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाण्याची भीषण टंचाई लवकरच इतिहासजमा होणार आहे. शहराचा पुढील ५० वर्षांचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी उभारण्यात येत असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. नुकतीच शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नाळिंबी गावाजवळ उल्हास नदीवर सुरू असलेल्या या प्रकल्पाची पाहणी केली.
अनेक वर्षांपासून शहरातील पाणीटंचाईवरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच, शिवसेनेने या टीकेला प्रत्यक्ष विकासकामांतून उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सुमारे २५८ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प जलदगतीने साकारत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराला सुमारे ९० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. नाळिंबी गावाजवळ उभारण्यात येणारा हा शहरातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा जलकुंभ आहे. या माध्यमातून अंबरनाथ पूर्व, पश्चिम तसेच ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता, हे पाणी पुढील ५० वर्षे शहराची गरज पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर कायमची मात होणार असल्याने शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पाहणीवेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, निखिल वाळेकर, सुभाष साळुंखे, अॅड. कृष्णा रसाळ पाटील, शशांक गायकवाड, प्रमोद चौबे, शैलेश भोईर, शीतल पवार, दीपक पवार यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासकामेही वेगाने
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी हा प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्णत्वास जाणार असल्याची माहिती दिली. यासोबतच शहरात स्पेनच्या धर्तीवर आधारित एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, शिव मंदिर परिसराचे सुशोभीकरण यांसारखी इतर विकासकामेही वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अंबरनाथ : शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नाळिंबी गावाजवळ उल्हास नदीवर सुरू असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

