ईडी, सीबीआय असताना चौकशी का नाही?

ईडी, सीबीआय असताना चौकशी का नाही?

Published on

अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : नगर परिषद निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र चांगलेच तापले आहे. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी थेट सवाल उपस्थित करत, भाजप एवढी वर्षे आमच्यासोबत सत्तेत होता. मग तेव्हा भ्रष्टाचार दिसला नाही का? निवडणुकीच्या तोंडावरच भाजप नेत्यांना आठवणी का जाग्या होतात? जर खरोखर भ्रष्टाचार झाला असेल तर ईडी, सीबीआय यांसारख्या केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी का केली जात नाही?, असा पलटवार केला.
राज्यात युती असली, तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याने शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलाबराव करंजुळे यांनी नुकत्याच झालेल्या प्रचारसभेत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शिवसेनेच्या सत्ताकाळात जेसीबी मशीन खरेदीतील भ्रष्टाचार, सुमारे ७० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पालिका इमारतीचा निकृष्ट दर्जा, रस्ते तसेच शहरातील कचरा व्यवस्थापन अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेना कंत्राटदारांना पाठीशी घालत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. भाजपकडून शहरात पाच दिवसांची ‘परिवर्तन पदयात्रा’ काढून ‘भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ’ हा नारा देत जनजागृती सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही शिवसेनेचा थेट उल्लेख न करता अंबरनाथमध्ये दहशतीचे वातावरण असल्याचे म्हटले होते.
भाजपच्या प्रचारशैलीवर टीका करताना वाळेकर म्हणाले, भाजप नेते नकारात्मक प्रचार करत आहेत, तर शिवसेना सकारात्मक विकास अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहे. खोटे आरोप करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. येत्या २० तारखेला मतदान तर २१ तारखेला मतमोजणी होणार असून, यंदा विजयाचा गुलाल शिवसेनाच उधळेल, असा विश्वास वाळेकर यांनी व्यक्त केला. दरम्यान अंबरनाथमधील शिवसेना–भाजप संघर्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

विकासकामांचा दावा
आरोपांना प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी भाजपवर पलटवार केला आहे. करंजुळे यांच्यावर टीका करताना वाळेकर म्हणाले की, करंजुळे २००५ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांना राजकारणात संधी शिवसेनेमुळे मिळाली; मात्र त्यांनी आजवर किती पक्ष बदलले, हे जनतेला माहिती आहे. वाळेकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शहरात झालेल्या विकासकामांची माहिती देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून नाट्यगृह, प्राचीन शिवमंदिराचा विकास, घनकचरा प्रकल्प, सिमेंट काँक्रीट रस्ते तसेच पाणीपुरवठा योजना अशा अनेक महत्त्वांच्या कामांची अंमलबजावणी झाल्याचा दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com