दुबार मतदारांचे आव्हान

दुबार मतदारांचे आव्हान

Published on

दुबार मतदारांचे आव्हान
वडिलांची नावेही सारखीच; ठाणे महापालिकेची शोध मोहीम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये तब्बल ८३ हजार ६४४ नावे दुबार आढळली आहेत. याची कबुली खुद्द महापालिकेने दिली आहे; मात्र या यादीत केवळ नाव- आडनावेच नव्हे तर वडिलांची नावेही सारखीच असलेले अनेक मतदार आहेत. या मतदारांच्या नामसाधर्म्यामुळे दुबारची यादी वाढली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या अशा आणि एकूण सर्वच दुबार मतदारांची शोधमोहीम ठाणे महापालिकेने हाती घेतली असून ज्यांची नावे दोन किंवा त्यापेक्षा अधिक प्रभागात आहे, त्यांच्याकडून शपथपत्र भरून घेतले जात आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने राजकीय पटलावर हालचाली वाढल्या आहेत; मात्र त्याआधीच ही निवडणूक मतदार याद्यांमुळे गाजत आहे. ठाण्यातील मतदार याद्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गोंधळ असून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेने त्याविरोधात पुराव्यांसह आरोप केले आहेत. यासर्व घडामोडींमध्ये पालिकेने जाहीर केलेल्या मतदार यादीत ८३ हजार ६४४ नावे दुबार असल्याची कबुली प्रशासनाने दिली होती.

प्रत्येक प्रभागामध्ये २०० ते ३०० दुबार मतदार असण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्देेशावरून बूथलेवल ऑफिसर म्हणजे बीएलओमार्फत या दुबार मतदारांचा शोध ठाणे महापालिका घेत आहे. या मोहिमेसाठी स्थानिक राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मदतही घेतली जात आहे. दोनपेक्षा जास्त प्रभागांमध्ये नावे असलेल्या मतदारांकडून एक प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे. यामध्ये मतदार एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याची हमी घेतली जात आहे. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे; पण या वेळी आणखी एक माहिती समोर आली आहे. अनेक मतदार दुबार भासत असले तरी प्रत्यक्षात केवळ नामसाधर्म्यामुळे हा गैरसमज होत असल्याचे समोर आले आहे.

नाव, आडनावच नव्हे तर अनेक मतदारांच्या वडिलांचे नावही एकसारखेच आहे; मात्र प्रत्यक्षात त्या व्यक्ती वेगवगळ्या असून त्यांचे फोटोही भिन्न आहेत. दिवा, कळवा, मुंब्रासारख्या काही प्रभागांमध्ये अशी अनेक उदाहरणे आढळून आली आहेत. त्यामुळे या मतदारांना दुबार म्हणता येणार नसल्याचे पालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुबारचा शिक्का मारणार
दुबार मतदान टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने जनजागृतीही सुरू केली आहे. घरोघरी शोध घेण्यासोबतच पालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांमध्येही शपथपत्रांचे अर्ज ठेवण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान करणार याची माहिती देणे बंधनकारक आहे. जे मतदार याची माहिती देणार नाहीत त्यांच्या नावापुढे दुबारचा शिक्का मारला जाणार आहे. इतकेच नव्हे तर मतदानाच्या दिवशीही हमीपत्र भरून घेतले जाणार आहे.

१७ डिसेंबरपर्यंत मुदत
त्यासाठी १७ डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर त्याची पुन्हा छाननी करून २७ डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करायची आहे; पण या यादीला कात्री लागण्याची शक्यता धूसर मानली जात आहे. मतदार यादीतून दुबार मतदारांना वगळण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांना नाही. त्यामुळे या मतदारांना ‘दुबार’ मतदानापासून रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.

मतदारांमध्ये वाढ
ठाणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर २० नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. २०१७च्या निवडणुकीत पालिका क्षेत्रात १२ लाख २८ हजार ६०६ इतके मतदार होते. तर २० नोव्हेंबरला प्रसिद्ध झालेल्या यादीत मतदारांची संख्या १६ लाख ४९ हजार ८६७ इतकी आहे. यामध्ये आठ लाख ६३ हजार ८७८ पुरुष तर सात लाख ८५ हजार ८३० महिला मतदार आहेत. म्हणजे सुमारे चार लाख २१ हजार २६१ मतदार वाढले असून ८३ हून अधिक मतदार दुबार नावाची आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com