विक्रमगडमध्ये आठवडे बाजार तेजीत
विक्रमगडमध्ये आठवडा बाजार तेजीत
तालुक्यात ग्रामीण अर्थचक्राला गती; लाखोंची उलाढाल
विक्रमगड, ता. १४ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यात ग्रामीण अर्थचक्राला गती देणारे आठवडा बाजार सध्या नागरिक व शेतकरी यांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहाराची मुख्य नस असलेल्या या बाजारात लाखोंची उलाढाल होत असून, हा बाजार ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरत आहे.
आठवडा बाजार हे ग्रामीण अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहाराचे सर्वात मोठे ठिकाण आहे. यामध्ये शेतमाल, कारागिरी, कलाकुसर वस्तू, पाळीव प्राणी, खाद्यपदार्थ आणि कपडे यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. तसेच, आठ दिवसांत झालेले आर्थिक व्यवहार येथे पूर्ण केले जातात. विक्रमगडच्या आठवडा बाजारात आजूबाजूच्या खेड्यापाड्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने बाजारहाट (खरेदी) करण्यासाठी येतात. ते मसाला, मिरची, हळद, कांदा, बटाटा, कडधान्ये आणि विविध प्रकारची सुकी मच्छी खरेदी करतात. विक्रमगडसह दादडे, तलवाडा, भोपोली, मलवाडा, पाचमाड, पाली आदी भागांतील आठवडी बाजार तेजीत आहेत. महागाईचा सामना करत नागरिक जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत आहेत.
आठवडा बाजारावर शेतकरी, लहान व्यापारी, कारागीर, हमाल, मजूर, दलाल अशा अनेक घटकांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. ग्रामीण भागातील आठवडी बाजारांवर प्रामुख्याने बारा बलुतेदारांची उपजीविका चालते.
बाजारहाट
- विक्रेते : जनरल स्टोअर्स, कपडे, भांडी, किराणा, शेती अवजारे, पशुखाद्य, खेळणी, चप्पल-बूट आणि शालेय साहित्य विक्रेते.
- प्रक्रिया व शेतमाल : गूळ, तेल, तूप, डाळ विक्रेते, अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि सुकामेवा विक्रेते.
- सेवा व इतर : चहापाणी हॉटेल्स, अल्पोपहार विक्रेते, मसाला व्यावसायिक, मटण व मासे विक्रेते तसेच हमाल, मालवाहतूक करणारे आणि रोजंदारी मजूर.
------------------
बुधवारी भरणाऱ्या विक्रमगडच्या आठवडी बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आम्ही जात असतो. आठवडा बाजारात स्वस्त वस्तू मिळत असल्याने आठवडाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू आम्ही खरेदी करतो.
- राजू भुसारा, ग्राहक
------------------
ग्रामीण भागातील बाजारात विविध प्रकारचे साहित्य विक्री होत असते. या बाजारात सामान विक्रीतून मोठ्या प्रमाणात नफा होत असतो.
- स्वप्नील पाटील, दुकानदार

