अपुऱ्या सुविधांमुळे ई-वाहने शोभेची!

अपुऱ्या सुविधांमुळे ई-वाहने शोभेची!

Published on

सुजित गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १४ ः पर्यावरणपूरक वाहतूक निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद देत वाहने खरेदी केली आहेत; मात्र तेवढ्या तुलनेत सार्वजनिक चार्जिंग स्टेशन तयार करण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेच्या हद्दीत सुमारे २० हजार ई-वाहने धावतात; मात्र या वाहनांसाठी अवघे ५० ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन असल्याने चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नवी मुंबई शहरात महापालिकेने चार्जिंग स्टेशन लावण्याचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न केला आहे; पण तो अपुरा ठरत आहे. नेरूळला ज्वेल ऑफ पार्क या उद्यानाजवळ चार पॉइंट असणारे एक चार्जिंग स्टेशन महापालिकेने सुरू केले आहे. त्याव्यतिरिक्त आणखीन १४८ पॉइंट असणारे स्टेशन उभारण्याचे काम महापालिका आगामी काळात करणार आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात धावणाऱ्या एनएमएमटी बससाठी वेगात चार्ज होणारे चार्जिंग स्टेशन उभारलेले आहेत; परंतु पेट्रोल पंप आणि इतर सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात महापालिकेचा यश आलेले नाही.

नवी मुंबईत बऱ्याच ठिकाणी मोकळ्या जागा आहेत. याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारता येणे सहज सोपे आहे; परंतु प्रशासन उदासीन असल्याने इलेक्ट्रिक वाहन मालकांचे हाल होत आहेत. पनवेल शहरात अद्याप महापालिकेने कोणत्याही ठिकाणी स्टेशन उभारलेले नाहीत. पनवेल महापालिकेची स्वतःची वाहतूक व्यवस्था नाही; परंतु तरीदेखील नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेने बसथांबे उभारून लाखो रुपये खर्च केले आहेत. त्याच धर्तीवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी विविध नोडनिहाय चार्जिंग स्टेशन उभारावे, अशी मागणी चालकांकडून होत आहे.

वीजजोडण्या दिल्या; पण स्टेशन अपुरे!
महावितरणच्या वाशी परिमंडळाने दिलेल्या माहितीनुसार, चार्जिंग स्टेशनकरिता एक हजार ९३८ वीजजोडण्या दिल्या आहेत. त्यापैकी वाणिज्य आणि व्यावसायिक वापराकरिता ५० टक्के प्रमाण असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे; मात्र प्रत्यक्षात यापेक्षा चार्जिंग स्टेशनचे प्रमाण खूप कमी आहे. एचपीसीएल, बीपीसीएल या पेट्रोल कंपन्यांनी नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील अद्याप बऱ्याच ठिकाणी चार्जिंग स्टेशन लावलेले नाहीत.

फक्त ५० ठिकाणी सेवा कार्यरत
ज्याठिकाणी चार्जिंग स्टेशन लावले आहेत, ते अद्याप सुरू केलेले नाहीत. सायन-पनवेल महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गावर एक-दोन ठिकाणे सोडली, तर इलेक्ट्रिक वाहनचालकांना शहरातील पंपावर स्टेशनचा आधार घ्यावा लागतो. शहरातील फक्त ५० ठिकाणी स्टेशन असल्याचे ॲपवरून दिसून येते.

कोकणात जाणाऱ्यांचे हाल
मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात इलेक्ट्रिक वाहन घेऊन जाणाऱ्यांसाठी मोठ्या अडचणी येतात. पेण येथे पेट्रोल पंपावर चार्जिंग स्टेशन नकाशावर दाखवत आहे; मात्र त्यापुढच्या प्रवासात चार्जिंग स्टेशन उपलब्ध झालेले दिसून येत नाही. त्यामुळे या मार्गावर प्रशासनाला मुबलक प्रमाणात चार्जिंग स्टेशन तयार करण्यात अपयश आले आहे.

किती, कुठे वाहनांची नोंद?
- पनवेल उपप्रादेशिक कार्यालय हद्द ११,९१२
- वाशी उपप्रादेशिक कार्यालय हद्द ८,२९७
- एकूण २०,२०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com