जंजिरा जलदुर्ग पुन्हा गजबजला!
जंजिरा जलदुर्ग पुन्हा गजबजला!
शैक्षणिक सहलींसाठी विशेष पसंती; मुरूड–काशीदमध्ये गर्दी
मुरूड, ता. १४ (बातमीदार) : थंडीचा हंगाम सुरू होताच डिसेंबरला पर्यटनासाठी सर्वोत्तम मानला जातो. याच पार्श्वभूमीवर मुरूड, काशीद बीच, दिवेआगर, श्रीवर्धन आदी कोकण किनारपट्टीवरील पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. विशेष म्हणजे यंदा ऐतिहासिक जंजिरा जलदुर्गावर शैक्षणिक सहलींची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत असून, याचा थेट लाभ स्थानिक हॉटेल, लॉजिंग, जलवाहतूक व छोटे व्यावसायिकांना होत आहे.
मुरूडपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या राजपुरी गावाच्या दक्षिणेस, भर समुद्रात उभा असलेला जंजिरा जलदुर्ग गेल्या सुमारे ३५० वर्षांपासून इतिहासाचा मूक साक्षीदार म्हणून अभेद्य पहारेकऱ्यासारखा उभा आहे. सुमारे २२ एकर क्षेत्रफळावर पसरलेल्या या किल्ल्याला २२ बुरुजांची भक्कम तटबंदी असून तोफा आजही त्याच्या सामर्थ्याची साक्ष देतात. मराठे, इंग्रज, डच आणि पोर्तुगीज अशा प्रबळ सत्तांनी अनेक प्रयत्न करूनही जंजिरा सर करू शकला नाही. म्हणूनच हा किल्ला ‘अजिंक्य जंजिरा’ म्हणून ओळखला जातो. राजपुरी तसेच खोरा बंदरातून शिडाच्या व यांत्रिक बोटींच्या माध्यमातून किल्ल्यावर जाण्यासाठी उत्तम जलवाहतुकीची व्यवस्था आहे. विशेषतः शिडाच्या बोटीतून केलेली जलसफर पर्यटकांना वेगळाच आनंद देते. निळेशार पाणी, फेसाळणाऱ्या लाटा आणि समुद्राची गाज नवख्या पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेत देश-विदेशातील इतिहासप्रेमी व हौशी पर्यटक किल्ल्याचे दर्शन घेत आहेत. जलवाहतुकीसाठी प्रौढ व्यक्तीकडून ६० रुपये, तर १२ वर्षांखालील मुलांकडून ३० रुपये आकारले जात असून, किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर पुरातत्त्व विभागाकडून २५ रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते.
..............
समुद्रकिनारी संस्कृतीचा अनुभव
डिसेंबरमध्ये उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शैक्षणिक सहली मोठ्या संख्येने जंजिऱ्यावर येत आहेत. इतिहास, भूगोल व समुद्रकिनारी संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळत असल्याने शिक्षक व शाळा व्यवस्थापनाकडून जंजिऱ्याला विशेष पसंती दिली जात आहे. जंजिरा दर्शनानंतर मुरूडचा विस्तीर्ण व रमणीय समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. एकदरा ब्रिज ते नबाब पॅलेसपर्यंत पसरलेला सुमारे अडीच किलोमीटरचा स्वच्छ व मोहक किनारा, तसेच पद्मदुर्ग किल्ल्याजवळ दिसणारा सूर्यास्ताचा देखावा नेत्रसुखद ठरतो. पहाटेची गुलाबी थंडी आणि समुद्रात बालगोपाळांसह डुबकी मारण्याचा आनंद पर्यटक अनुभवत आहेत.
.................
वाहनतळाची उत्तम सोय
अलीकडे मुरूड समुद्रकिनाऱ्याचे सुशोभिकरण अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले असून २०० हून अधिक वाहनांसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे पर्यटकांना किनाऱ्यावर मुक्तपणे फिरता येत असून समुद्री साहसी खेळांचा आनंदही घेता येत आहे. शहाळ्यासह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, मच्छी मार्केटमधील ताजी मासळी तसेच माडीवरील गोड माडीची चव पर्यटकांची खास आकर्षणे ठरत आहेत. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुरूड पर्यटन महोत्सवाबाबत केवळ चर्चा सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुरूड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार असून, त्यानंतरच पर्यटन महोत्सवाची रूपरेषा व भव्यता ठरेल, अशी चर्चा परिसरात रंगली आहे. पर्यटन हंगामामुळे सध्या तरी मुरूड–जंजिरा परिसरातील स्थानिक अर्थकारण चांगलेच गतिमान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

