पर्यटनामुळे पोयनाड–पेझारीच्या अर्थकारणाला गती

पर्यटनामुळे पोयनाड–पेझारीच्या अर्थकारणाला गती

Published on

पर्यटनामुळे पोयनाड-पेझारीच्या अर्थकारणाला गती
डिसेंबरच्या पर्यटन हंगामाचा लाभ; वडापाव, भाजीपाला विक्रेत्यांचे उत्पन्न वाढले
पोयनाड, ता. १४ (बातमीदार) : सध्या थंडीचा हंगाम सुरू असून, डिसेंबर महिना हा पर्यटनासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. या पार्श्वभूमीवर अलिबाग आणि मुरूडकडे पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे पोयनाड आणि पेझारी नाका परिसरातील स्थानिक अर्थकारणाला चांगलीच चालना मिळाली आहे. पर्यटनाचा थेट लाभ येथील लहान व्यावसायिक, फेरीवाले, महिला भाजीविक्रेते तसेच स्थानिक शेतकऱ्यांना होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मागील काही वर्षांपासून गोव्याला जाण्याऐवजी अनेक पर्यटक अलिबाग, मुरूड, नांदगाव, काशीद यांसारख्या कोकणातील पर्यटनस्थळांना पसंती देत आहेत. या पर्यटकांचा प्रवास प्रामुख्याने पेण-अलिबाग राज्यमार्गावरून होत असल्याने वाटेत येणाऱ्या पोयनाड आणि पेझारी नाका येथे थांबून खाणे-पिणे, खरेदी करणे याला प्राधान्य दिले जात आहे. परिणामी येथे असलेल्या वडापावविक्रेते, चहाच्या टपऱ्या, फळे व भाजीपाला विकणाऱ्या महिला, तसेच लहानमोठ्या वस्तू विकणाऱ्यांच्या व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आहे. याआधी पेझारी नाक्यावर मुख्यतः शनिवार-रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीच ग्राहकांची गर्दी दिसून येत असे, मात्र सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्याने आठवड्याचे सातही दिवस या परिसरात खवय्यांची व पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. सर्वसामान्यांची भूक भागवणारा वडापाव आज पोयनाड-पेझारीची एक ओळख ठरत असून, खास चवीसाठी अनेक पर्यटक आवर्जून येथे थांबताना दिसत आहेत.
............
स्‍थानिक पालेभाज्यांना मागणी
पर्यटनासाठी येणारे पर्यटक स्थानिक शेतकऱ्यांकडून पालेभाज्या, फळे, कोकणातील पारंपरिक उत्पादने तसेच घरगुती पदार्थ खरेदी करत असल्याने थेट शेतकरी आणि विक्रेत्यांच्या उत्पन्नात भर पडत आहे. ग्रामीण महिलांसाठी हा हंगाम रोजगारनिर्मितीचा ठरत असून, त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाला हातभार लागत आहे. त्यामुळे पर्यटन हे केवळ फिरण्यापुरते मर्यादित न राहता स्थानिक विकासाचे साधन बनत असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे. पर्यटनामुळे पोयनाड-पेझारी परिसरात आर्थिक चक्र गतिमान झाले असले तरी त्याचबरोबर काही अडचणीही निर्माण होत आहेत. वाढती गर्दी, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि अरुंद रस्ता यामुळे स्थानिक नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
..............
चौकट : वाहतूक कोंडीचे आव्हान
पर्यटनामुळे पोयनाड-पेझारी परिसरातील स्थानिक अर्थकारणाला गती मिळत असली तरी पेण-अलिबाग राज्यमार्गावर पोयनाड ते पेझारीदरम्यान सतत होणारी वाहतूक कोंडी हे मोठे आव्हान ठरत आहे. पूर्वी ही कोंडी प्रामुख्याने शनिवार-रविवारपुरती मर्यादित होती; मात्र आता आठवड्याचे सातही दिवस वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढले आहेत. याचा परिणाम स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर तसेच व्यवसायावरही होत आहे. त्यामुळे पर्यटनाचा लाभ टिकवून ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन, रस्ते रुंदीकरण आणि नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com