तालुक्यात पहाटे दाट धुक्यसह बोचरी थंडी
तालुक्यात पहाटे दाट धुक्यासह बोचरी थंडी
शेकोटीचा आधार; उबदार कपड्यांना मागणी वाढली
पोलादपूर, ता. १४ (बातमीदार) : पावसाळा लांबल्याने यंदा थंडी जाणवणार की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. पहाटेच्या सुमारास दाट धुके पडू लागले असून, सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर धुक्याची पांढरी झालर पसरलेली दिसत आहे. त्याचबरोबर हवेत गारवा वाढल्याने पोलादपूर तालुक्यात बोचरी थंडी नागरिकांना जाणवू लागली आहे.
हिवाळ्याची चाहूल लागताच अनेक दिवस कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेले उबदार कपडे बाहेर निघाले आहेत. मफलर, स्वेटर, जॅकेट, कानटोपी तसेच हात व पायमोजे यांचा वापर वाढला असून, ग्रामीण भागात रात्री शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. सकाळी मात्र कोवळ्या उन्हाची प्रतीक्षा नागरिकांना करावी लागत असून, धुक्यामुळे दैनंदिन कामकाजावरही परिणाम होत आहे. परतीचा पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने हवामानातील बदलांबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या होत्या, मात्र आता गेल्या काही दिवसांपासून थंडीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. पहाटे गुरे चरायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना गारव्याचा मारा सहन करावा लागत असून, शेतीसह इतर कामांमध्ये ते व्यग्र असल्याचे चित्र आहे. थंडी वाढत असल्याने तालुक्यातील बाजारपेठेत उबदार कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे. अनेक व्यावसायिकांनी हिवाळी साहित्याची दुकाने सजवली असून, ग्राहकांचीही गर्दी वाढताना दिसत आहे.
.................
दरम्यान, राज्यातील अनेक भागांत किमान तापमान सातत्याने घटत असल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला असून, १० डिसेंबरनंतर थंडी अधिक तीव्र होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर सध्या जाणवणारा बोचरा गारवा पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

