लोहारमाळचा वणवा वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण
लोहारमाळचा वणवा वाढल्याने अग्निशमन दलाला पाचारण
संभाव्य मोठा अनर्थ टळला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पोलादपूर, ता. १४ (बातमीदार) : पोलादपूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून वणव्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात तालुक्यात पुन्हा वणव्याची मालिका सुरू झाल्याचे चित्र आहे. गुरूवारी लोहारमाळ परिसरात लागलेल्या वणव्याची झळ थेट वस्तीपर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग घराजवळ येताच तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच महाड अग्निशमन दलासह औद्योगिक वसाहतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीची व नियोजनबद्ध कारवाई करत सुमारे तासाभरात वणव्यावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आगीचा फैलाव रोखला गेला आणि मोठी जीवित व वित्तहानी टळली. लोहारमाळ परिसरातील श्रीकांत बागडे यांच्या वनराईजवळ हा वणवा लागला होता. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच बागडे यांनी स्वतः पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तत्परतेमुळे व अग्निशमन दलाच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सायंकाळी किंवा पहाटेच्या सुमारास गवत व झाडांचा पाला जळून जावा या उद्देशाने वणवे पेटवले जातात. मात्र वाऱ्याचा वेग वाढल्याने हे वणवे नियंत्रणाबाहेर जाऊन यापूर्वीही अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील डोंगररांगांवर वणवे लावण्याचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत.
.................
गैरसमजुतीसह चुकीच्या परंपरा
या वणव्यांमुळे तालुक्यातील अनेक उपयुक्त वृक्षवेली नष्ट होत असून वन्यजीव, पशुपक्षी तसेच स्थावर-जंगम मालमत्तेचे मोठे नुकसान होत आहे. वणवा विरोधी कायदा अस्तित्वात असला तरी तो सक्षमपणे राबविला जात नसल्याने कायद्याचे भय उरलेले नाही, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात गवताची चांगली वाढ व्हावी, या गैरसमजातून व चुकीच्या परंपरेतून वणवे पेटवले जातात. मात्र या कृतीला कोणतेही शास्त्रीय कारण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. वारंवार होणारे वणवे रोखण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई नव्हे, तर व्यापक जनजागृती व समाज परिवर्तनाची नितांत गरज असल्याचे चित्र या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

