पाण्यासाठी बोंबाबोंब
पाण्यासाठी बोंबाबोंब
५० टक्के कपात; खासगी टँकरसाठी दुप्पट भुर्दंड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ ः ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी शहरात लागू झालेल्या ५० टक्के पाणीकपातीची झळ रविवारी (ता. १४) तीव्र झाली. उथळसर, घोडबंदर तसेच वर्तकनगर परिसरात पाण्याच्या बोंबाबोंबने रविवारची सकाळ उजाडली. मोठ्या गृहसंकुंलासोबत झोपडपट्टी भागातही पाण्याचा ठणठणाट जाणवू लागल्याने स्थानिक माजी नगरसेवकांचे फोन सकाळपासूनच खणखणू लागले. तर दुसरीकडे ठाणे पालिकेकडेही जादा टँकरची मागणी वाढली; मात्र जास्तीचा पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्याने अनेक सोसायट्यांनी खासगी टँकर्सना पाचारण केले. धक्कादायक म्हणजे अडचण पाहून टँकर लॉबीनेही १० हजार लिटर पाण्याच्या टँकरसाठी सात ते दहा हजार रुपये उकळण्यास सुरुवात केली आहे.
पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून नेणारी एक हजार मिमी व्यासाची जलवाहिनी दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा फुटली आहे. त्यामुळे आधी ३० टक्के तर नंतर ५० टक्के पाणीकपात ठाणे महापालिकेकडून लागू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या कपातीची झळ आता अधिक तीव्र होऊ लागली आहे. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर भागाला आधीच पाणी अपुरे पडत आहे. त्यात ५० टक्के कपातीने भर टाकली आहे. येथील बहुतेक सर्वच गृहसंकुलांना दररोज तीन ते चार टँकर मागवून पाण्याची गरज भागवावी लागत आहे. यावर त्यांना किमान १० ते १५ हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे. आता पाणीकपात सुरू झाल्यामुळे हा खर्च दुपटीने वाढल्याची तक्रार होऊ लागली आहे. ठाणे पालिकेकडून होणारा पुरवठा अपुरा भासत असल्यामुळे आणि ठाण्यातूनच नव्हे तर मुंबईतूनही टँकर मागवले जात आहेत; मात्र दामदुपटीने टँकरचालकांनी ठाणेकरांची लूट चालवल्याच्या तक्रारी आहेत.
तोंडचे पाणी पळाले
विकासाकडे झेप घेणाऱ्या ठाण्यामध्ये टँकरचा फेरा वाढला आहे. येथील झोपडपट्टीबहुल भागासह श्रीमंत वस्ती असलेल्या गृहसंकुलांनाही टँकरचा आधार घ्यावा लागत असल्यामुळे संताप वाढला आहे. या रोषाला येथील स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांना आणि माजी नगरसेवकांना तोंड द्यावे लागत आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर सुरू असलेल्या पाणीबाणीने इच्छुकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून रोज सकाळपासून पाण्यासाठी फोन खणखणत असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी सांगितले. रहिवाशांचे फोन येताच ठाणे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे संपर्क साधला जात आहे; पण आडातच नाही तर पोवऱ्यात कुठून येणार, अशी अवस्था सध्या असल्याचे त्यांनी सांगितले.
झोपडपट्टी भागात भीषण परिस्थिती
गृहसंकुलांमध्ये टँकरचे पाणी साठवणूक करता येते; पण झोपडपट्टी भागांमध्ये तशी व्यवस्था नाही. त्यामुळे नळाला येणारे पाणी पिण्यासाठी भरून टँकरचे पाणी प्लॅस्टिकच्या ड्रममध्ये भरून ठेवताना तारंबळ उडत असल्याचे चित्र आहे.
स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
पिण्यासाठी बाटली बंद पाण्याचा पर्याय आहे; पण स्वच्छतेसाठी पाणी आणायचे कुठून, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बहुतेक घरांमध्ये पाश्चात्त्य पद्धतीचे कमोड आहेत. एका फ्लशसाठी दोन ती चार लिटर पाणी लागते. अनेक घरांमध्ये धुण्याच्या कपड्यांचा ढिगारा साठला असल्याच्या प्रतिक्रियाही ऐकू येत आहेत.
ठाणे पालिकेकडून पूर्ण प्रयत्न
शहरात ५० टक्के पाणीकपात लागू असली तरी झोनिंग पद्धतीने सर्वच भागांमध्ये १२ तासांतून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्यासाठी हे पाणी मुबलक आहे. स्वच्छतेच्या कामांसाठी पालिकेकडून टँकरही पुरवले जात आहेत. दिवसाला सुमारे ८५ ते ९० टँकरच्या शेकडो फेऱ्या ठाण्यात होत असल्याचा दावा ठाणे पालिकेचे अधिकारी विनोद पवार यांनी केला आहे. वागळे, नौपाडा, लोकमान्यनगर, कळवा येथून फारशा तक्रारी नाहीत; पण घोडबंदर भागातून सर्वाधिक तक्रारी येत आहेत. झोनिंग आणि टँकरने होणारा पाणीपुरवठा गृहसंकुलांना अपुरा पडत असल्याने त्यांनी खासगी टँकरचा आधार घेत असल्याचे ते म्हणाले.
आणखी दोन दिवस टंचाईचे
कल्याण फाटा येथे दोन वेळा जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी जीर्ण झाली असून आता ती पूर्णपणे बदलण्याचे काम ठाणे महापालिकेने हाती घेतले आहे. सुमारे ३० मीटरचा पॅच पूर्णपणे खोलून ही दुरुस्ती सुरू आहे. आतापर्यंत १० मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले असून दोन दिवसांत ते युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे ठाणेकरांना आणखी काही दिवस पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

