पांडवकडा संवर्धनासाठी सायकल रॅली
पांडवकडा संवर्धनासाठी सायकल रॅली
नामशेष होत असलेल्या टेकड्या वाचवा; आंतरराष्ट्रीय पर्वतदिनानिमित्त आवाहन
खारघर, ता. १४ (बातमीदार) : जैवविविधतेने नटलेल्या खारघरच्या टेकड्या आणि पांडवकडा धबधबा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय पर्वतदिनानिमित्त रविवारी खारघर डोंगरावर सायकल रॅली काढून सार्वजनिक स्वाक्षरी मोहीम राबवली. या उपक्रमात ऐंशी वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ५० हून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते.
वेटलँड्स अँड हिल्स, नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि पनवेल वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्वतदिनानिमित्त उत्सव चौक ते खारघर डोंगर अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली. खारघर डोंगर येथे विकासाच्या नावाखाली गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या प्रमाणावर सपाटीकरण झाल्याची चिंता पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
पांडवकडा धबधबा हा दुर्मिळ धबधब्यांपैकी एक आहे. स्थानिक लोककथेनुसार या धबधब्याचे नाव महाभारताशी जोडलेले असून, पांडवांनी वनवासाच्या काळात या परिसरात वास्तव्य केल्याचे सांगितले जाते. हनुमानकडा प्रवाहातून पाणी मिळणारा हा धबधबा संवेदनशील डोंगराळ परिसंस्थेचा अविभाज्य भाग आहे. या परिसंस्थेचे पर्यावरणीय महत्त्व सुमारे दोन दशकांपूर्वी वैज्ञानिकदृष्ट्या नोंदवले गेले आहे.
सिडकोने नियुक्त केलेल्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने २००७ मध्ये केलेल्या जैवविविधता सर्वेक्षणात खारघर टेकडीच्या पठारावरील निसर्ग उद्यान अत्यंत समृद्ध असल्याचे स्पष्ट झाले. या भागात ४८७ दुर्मिळ वनस्पतींसह अनेक वनस्पती प्रजाती, २९५ कीटक प्रजाती, १५ अपृष्ठवंशी प्राणी, १२ मासे, ९ उभयचर, २८ सरपटणारे प्राणी, १७९ पक्षी आणि १२ सस्तन प्राण्यांच्या प्रजातींची नोंद संशोधकांनी केली आहे.
उत्सव चौक ते खारघर डोंगर काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार, खारघर वेटलँड्स अँड हिल्स फोरमच्या निमंत्रक ज्योती नाडकर्णी, सुदीप आठवले यांच्यासह मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमी सहभागी झाले होते. या मोहिमेद्वारे खारघरच्या टेकड्या आणि पांडवकडा धबधब्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.
चौकट
खारघर टेकडीचा वाढता धोका
खारघर टेकडीवर सुरू असलेले खाणकाम, डोंगरतोड आणि अनियंत्रित बांधकाम विस्तार यामुळे डोंगराचा हळूहळू ऱ्हास होत आहे. पांडवकडा येथे समुद्रात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून साठवण तलाव उभारण्याची मोठी संधी आहे, मात्र डोंगरावर होणारी वृक्षतोड आणि दगड खाणींतील स्फोटांमुळे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असून, बिबटे, कोल्हे आणि साप यांसारखे वन्यप्राणी वाढत्या प्रमाणात जवळच्या निवासी भागात प्रवेश करत आहेत. यामुळे मानवी वसाहतींना धोका निर्माण होत आहे. डोंगर वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी एकत्र येऊन खारघर टेकड्यांच्या संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

