महावितरणला स्वस्त कर्जाचा आधार

महावितरणला स्वस्त कर्जाचा आधार

Published on

महावितरणला स्वस्त कर्जाचा आधार
कमी व्याजाचे कर्ज घेत ‘एसबीआय’च्या कर्जाची परतफेड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः आतापर्यंत जादा व्याजदराच्या कर्जाचा भार वाहणाऱ्या महावितरणला आता खऱ्या अर्थाने स्वस्त कर्जाचा आधार मिळाला आहे. महावितरणकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) ८.६५ टक्के ते ९.२५ टक्के व्याजदराने तब्बल १२,८०० कोटी रुपयांचे कर्ज होते. या कर्जावर व्याज जादा असल्याने महावितरणने अन्य वित्तीय संस्थेकडून कमी व्याजदराचे कर्ज उभारून आणि स्वनिधीतून त्याची एकाच हप्त्यात मुदतपूर्व परतफेड केली आहे. त्यामुळे व्याजापोटी कंपनीवर पडणारा भार हलका होणार आहे.
महावितरणने विविध टप्प्यांवर स्टेट बँकेकडून एकूण १२,८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचा व्याजदर जास्त असल्याने वर्षाला ८०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम व्याजापोटी मोजावी लागत होती. त्यामुळे महावितरणने वेगवेगळ्या वित्तीय संस्थेकडून ७,१०० कोटी रुपयांचे कर्ज ८.२५ टक्के इतक्या कमी व्याजदराने उभारून उभारत स्टेट बँकेच्या कर्जाची परतफेड केली आहे. तसेच स्वनिधीतून ५,६३४ कोटी रुपये स्टेट बँकेच्या कर्जाचा भरणा केला असल्याचे महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांनी सांगितले. कंपनीसाठी भविष्यात खासगी किंवा सार्वजनिक बाँड उभारायचे झाल्यास त्यासाठीही इतक्या मोठ्या कर्जाची परतफेड करणे, उपयुक्त ठरणारे आहे. आगामी काळात महावितरणला शेअर बाजारात सूचिबद्ध करण्याच्या दृष्टीनेही ही कर्जाची परतफेड महत्त्वाची मानली जात आहे.

दहा सर्कलचा महसूल तारणमुक्त
महावितरणने स्टेट बँकेचे कर्ज घेताना आपल्या दहा सर्कलमधील महसूल तारण म्हणून ठेवला होता. या सर्कलमध्ये वार्षिक ३० हजार कोटी रुपयांचा महसूल आहे. स्टेट बँकेचे सर्व कर्ज फेडल्यामुळे हा महसूल तारणमुक्त होईल. त्या आधारे कंपनीला ५० हजार कोटी रुपयांपर्यंतचा निधी माफक व्याजदराच्या कर्जरूपाने उभा करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com