बदलापूर स्थानकात मध्यरात्री अभूतपूर्व गोंधळ; बंगळूर एक्सप्रेस थांबल्याने लोकल सेवा ठप्प!

बदलापूर स्थानकात मध्यरात्री अभूतपूर्व गोंधळ; बंगळूर एक्सप्रेस थांबल्याने लोकल सेवा ठप्प!

Published on

एक्स्प्रेस थांबल्याने लोकल सेवा ठप्प!
बदलापूर स्थानकात मध्यरात्री प्रवाशांचा गोंधळ
बदलापूर, ता. १४ (बातमीदार) ः बदलापूर रेल्वे स्थानकात शनिवारी (ता. १३) रात्री १२च्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. मुंबई बंगळूर एक्स्प्रेस अचानक बदलापूर स्थानकात थांबवण्यात आली. परिणामी मध्य रेल्वेच्या बदलापूर, कर्जत व खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल एकामागोमाग एक खोळंबल्या. रात्रीची वेळ असूनही स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी जमली होती. तब्बल दीड ते दोन तास लोकल सेवा विस्कळित झाल्याने उशिराने घरी परतणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवासी गाड्यांमध्येच अडकून पडले, तर काहींनी संताप व्यक्त करत रेल्वे रुळावर उतरून गोंधळ घातला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळूर एक्स्प्रेस मुंबईहून सुटल्यानंतर एका डब्यात प्रवाशांचे साहित्य चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. संतप्त प्रवाशांनी प्रथम कल्याण स्थानकात साखळी खेचून, गाडी १० ते १२ मिनिटांसाठी थांबवली. या वेळी स्टेशन मास्तरांनी तक्रार कर्जत स्थानकात नोंदवली जाईल, असे सांगून एक्स्प्रेस पुढे रवाना केली, मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने, अंबरनाथ ते बदलापूर यादरम्यान पुन्हा साखळी खेचून गाडी थांबवण्यात आली. काही वेळ समजूत काढल्यानंतर गाडी सोडण्यात आली, मात्र बदलापूर स्थानकात पोहोचताच पुन्हा साखळी खेचली.
--
स्थानकात ठाण मांडले
या वेळी चोरी झालेल्या डब्यातील ५० ते ६० प्रवासी बदलापूर स्थानकात उतरले आणि ‘जोपर्यंत आमचे चोरीला गेलेले सामान मिळत नाही, तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही,’ असा पवित्रा घेत स्थानकातच मांडी घालून बसून राहिले. परिस्थिती चिघळल्याने रेल्वे पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली. पोलिस व रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त प्रवासी कोणतेही आश्वासन ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. या गोंधळाचा फटका एक्स्प्रेसच्या मागून येणाऱ्या सर्वच लोकल व इतर एक्स्प्रेस गाड्यांना बसला आणि एकाच ट्रॅकवर गाड्यांची रांग लागली.
---
रुळावर उतरून निषेध
अखेर पर्याय नसल्याने बंगळूर एक्स्प्रेस कर्जतच्या दिशेने रवाना करण्यात आली, मात्र गोंधळ घालण्यासाठी उतरलेल्या १५ ते २० प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. यानंतर या प्रवाशांनी पुन्हा एकदा बदलापूर स्थानकात कल्ला करत रेल्वे रुळावर उतरून निषेध व्यक्त केला. त्यांना खोपोली लोकलमध्ये बसवून कर्जत येथे पुढील व्यवस्था केली जाईल, असे सांगण्यात आले, मात्र त्यावरही समाधान झाले नाही. पुढे वांगणीदरम्यान पुन्हा एकदा बंगळूर एक्स्प्रेस थांबवण्यात आली. जवळपास दीड ते दोन तास हा गोंधळ सुरू राहिल्याने कर्जत, बदलापूर व खोपोली मार्गावरील १० पेक्षा अधिक लोकल गाड्यांवर गंभीर परिणाम झाला. या प्रकारामुळे रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे मोठे हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com