भारत गॅस एजन्सीच्या नव्या नियमांचा फटका
भारत गॅस एजन्सीच्या नव्या नियमांचा फटका
ग्रामीण भागातील गृहिणी संतप्त; सिलेंडर असूनही वितरण रखडले
रोहा, ता. १४ (बातमीदार) : रोहा शहरातील भारत गॅस एजन्सीने अचानक लागू केलेल्या नव्या नियमांमुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील गृहिणींमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त होत असून, वेळेवर सिलेंडर न मिळाल्याने अनेक कुटुंबांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. गॅस संपल्यानंतर तत्काळ बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने महिलांना स्वयंपाकासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सिलेंडर भरलेली गाडी गावात येऊनही नव्या नियमांमुळे वितरण न करता परत जात असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे सिलेंडर आमच्या दारापर्यंत येतो, पण हातात मिळत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वी नियमितपणे सिलेंडर मिळत असताना अचानक नियम बदलल्याने नागरिक गोंधळून गेले आहेत. आम्ही सिलेंडर बुकिंग केलेले असतानाही गॅस मिळत नाही. घरात स्वयंपाकच होऊ शकत नाही. शाळकरी मुलांचे डबे कसे भरायचे, रोजंदारीवर जाणाऱ्यांचा स्वयंपाक कसा करायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा भावना अनेक गृहिणींनी व्यक्त केल्या. अनेक घरांमध्ये गॅस संपल्याने चुली पेटवाव्या लागत असून पर्यायी व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागत आहे. नव्या नियमांमुळे विशेषतः एकाच सिलेंडरवर अवलंबून असलेली ग्रामीण कुटुंबे अधिक अडचणीत सापडली आहेत. माहिती न देता नियम लागू केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
...........
नियमानुसारच वितरण
या संदर्भात भारत गॅस एजन्सीचे रोहा प्रमुख शकील अधिकारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कंपनीने नवीन नियम लागू केले असून त्यानुसारच सिलेंडर वितरण करण्यात येत आहे. जर ग्राहकाने महिन्याच्या १ तारखेला सिलेंडर घेतला असेल, तर पुढचे बुकिंग तो केवळ १५ तारखेनंतरच करू शकतो. त्याआधी केलेले बुकिंग ग्राह्य धरले जाणार नाही. सिलेंडर देताना ग्राहकांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी दिल्यानंतरच सिलेंडर ताब्यात दिला जाईल. ग्राहकांना माहिती मिळावी यासाठी व्हॉट्सॲप संदेश तसेच नव्या नियमांचे बॅनर लावण्यात येणार आहेत. आमची सेवा सुरळीत सुरू आहे. ज्यांना डबल सिलेंडर हवा असेल त्यांनी कार्यालयात कागदपत्रे सादर करून ३,२७० रुपये भरून दुसरा सिलेंडर घ्यावा.
.....................
गॅस एजन्सींना सूचना देऊ
याबाबत रोहा तहसील कार्यालयाच्या पुरवठा अधिकारी हेमलता भोईर यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, की या संदर्भात शासनाचा अधिकृत निर्णय अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र चौकशी केली असता गॅस वितरकांनी सांगितले की, त्यांच्या सिस्टीमनुसार १५ दिवसांच्या आत सिलेंडर बुकिंग होत नाही. ही वस्तुस्थिती खरी आहे. तरीदेखील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी लवकरच गॅस एजन्सींना पत्र देऊन नव्या नियमांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या जातील. ग्राहकांना नव्या नियमानुसार कशा प्रकारे सुविधा मिळतील, याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

