पनवेल महापालिकेवर आज मोर्चा
कामोठे, ता. १५ (बातमीदार) : नागरी समस्यांवर प्रशासन आणि सत्ताधारी भाजपला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने उद्या मंगळवारी (ता. १६) पनवेल महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवर जोर दिला जाणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या अनुषंगाने पनवेल विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र चूल मांडलेल्या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना फटका सहन करावा लागला. आगामी काळात महापालिका निवडणुकीत मागील चुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एकवटले आहेत. माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मंगळवारी मोर्चा काढून मतदारांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मोर्चातील प्रमुख मागण्यांची माहिती दिली. त्यात प्रामुख्याने मालमत्ता करामध्ये सुधारणा करावी, पाण्याचे नियोजन, कंत्राटी कामातील, रस्ते कामातील अपारदर्शकता, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेकडून मतदारांना भुरळ घालण्यासाठी जवळपास ७०० कोटींहून अधिक कामांचे भूमिपूजन भाजपचे आमदार, नगरसेवक कसे काम करू शकतात, याची माहिती मागितली जाणार आहे.

