आंब्याला विम्याचे कवच
आंब्याला विम्याचे कवच
सहभागी होण्याचे कृषी विभागाकडून आवाहन
वाणगाव, ता. १४ (बातमीदार) ः बदलते हवामान, अवेळी पडणारा पाऊस, तापमानात बदल यामुळे दरवर्षी आंबापिकावर त्याचा विपरीत परिणाम होतो. मोहोर गळणे, मोहोर करपणे, फळगळ होणे अशा समस्या सातत्याने जाणवतात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातचे उत्पादन जाऊन पूर्ण हंगाम वाया जाऊन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या या आर्थिक नुकसानीला आळा बसविण्यासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा फळपीक विमा योजना शासनामार्फत राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या आंबा बागेचा विमा १५ डिसेंबरपूर्वी उतरवून आपली आंबा बाग विमा संरक्षित करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केले आहे.
पालघर जिल्ह्यासाठी आंबिया बहरातील आंबा आणि काजू या फळपिकांसाठी यापूर्वी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत होती; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना www.pmfby.gov.in या फळपीक विमा पोर्टलवर सहभाग नोंदविता येत नव्हता, या अडचणी लक्षात घेऊन सरकारने केंद्राकडे मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर केला. त्याला केंद्र सरकारने अनुमती दिल्याने आता जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत फळपीक विमा योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्तावपत्रक पूर्ण भरून ई-पीक पाहणी भरून फळबागेची नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, फळपिकाची बाग उत्पादनक्षम असल्याबाबत स्वयंघोषणापत्र, फळबागेचा जिओ टॅग फोटो, विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत, वि.का.स. सेवा सोसायटीत अथवा सीएससी केंद्रात अंतिम मुदतीपूर्वी जमा करावी. एका शेतकऱ्याला दोन्ही हंगाम मिळून कमीत कमी १० गुंठे आणि जास्तीत जास्त चार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करता येऊ शकते.
आंबा फळपीक विम्याचे स्वरूप
विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी १०० झाडांसाठी प्रति हेक्टरी २१ हजार २५० रुपये विमा हप्ता भरायचा असून विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार रुपये एवढी आहे. प्रति झाड २१२.५० रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे, तर गारपीटसाठी प्रति हेक्टरी दोन हजार ८५० रुपये शेतकऱ्यांना भरायचे असून त्याची विमा संरक्षित रक्कम ५७ हजार रुपये इतकी आहे. एक हेक्टरसाठी नियमित एकूण विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार तर गारपीट विमा संरक्षित रक्कम ५७ हजार असे एकत्रित हेक्टरी दोन लाख २७ हजार संरक्षित रक्कम असणार आहे.
गारपीटसंदर्भात शासनाची प्रमाणके
१ फेब्रुवारी ते ३१ मेदरम्यान गारपीटमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांची गारपीटमुळे नुकसान झाल्यापासून ७२ तासांत नुकसानग्रस्त फळपिकाची माहिती विमा कंपनीस संबंधित मंडळ कृषी अधिकारी यांना कळविणे आवश्यक आहे, त्यानंतर विमा कंपनी, जिल्हा महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल.
हवामानातील अनिश्चिततेमुळे बागायती शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होते. या योजनेत सहभागी झाल्यास जोखमीपासून संरक्षण मिळू शकते. आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन मुदतीपूर्वी फळपीक विमा योजनेत सहभागी होऊन आपले फळपीक विमा संरक्षित करावे.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

