महायुतीचे घोडे अडकले
सुजित गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : राज्यातील महापालिका निवडणुका घोषित झाल्या आहेत. नवी मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्यावर महायुतीतील शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये अद्याप एकमत होत नाही. पक्षश्रेष्ठींनी एकत्र लढवणूक लढवण्याचा दबाव दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांवर टाकला आहे, परंतु जागावाटप करताना कोणता फॉर्म्युला वापरायचा, हे ठरत नसल्याने महायुतीचे घोडे अडकले आहेत.
राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचा अजित पवार गट असे महायुतीचे सरकार आल्यानंतर नवी मुंबई शहरात राजकीय गटांची ताकद वाढली आहे. एकेकाळी विरोधी पक्षात असणाऱ्या शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतरही शिंदे गटाची शक्ती वाढली आहे. काही महिने आधी शिवसेनेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातून आलेल्या १८ माजी नगरसेवकांमुळे शिंदे सेनेकडे माजी नगरसेवकांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. या नगरसेवकांना उमेदवारीत सामावून घेण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांचा खटाटोप सुरू आहे.
शिवसेनेची ताकद वाढत असताना दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या समर्थकांकडून शिंदेंवर होणाऱ्या टीकास्त्रांमुळे दोन्ही गटांच्या नेत्यांमधील अंतर वाढले आहे. अशातच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत नसल्याचे पक्षश्रेष्ठींना स्थानिक नेत्यांकडून युती न करण्याचा सल्ला दिला जात आहे. युती झाल्यास दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत बंडखोरीला सामोरे जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
२०१५ च्या नगरसेवकांनुसार फॉर्म्युला
महापालिकेच्या २०१५ मधील निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार फॉर्म्युला तयार करण्यावर भाजपचा आग्रह आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडून आलेले सर्व ७८ नगरसेवक भाजपमध्ये आले. त्या वेळी नगरसेवक असणाऱ्यांना आता भाजपमध्ये पुन्हा संधी देण्याची मागणी भाजपने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, तर याच काळात शिवसेनेकडे असलेल्या नगरसेवकांना त्यांची जागा देण्यास भाजप तयार आहे. शिंदेसेनेमध्ये अलीकडच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेल्या नगरसेवकांसाठी जागा सोडता येणार नाही. त्यांच्यासाठी उर्वरित जागांवर सामावून घेण्याबाबत चर्चा करा, असा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींना दिल्याचे भाजपचे नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रभारी डॉ. संजीव नाईक यांनी सांगितले.
भाजपने मुलाखती घेतल्या
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. निवडणुकीकरिता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ८५० इच्छुकांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. याचा अहवाल प्रदेश भाजपकडे पाठवला असून, त्यांच्याकडून उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.
शिंदे गटात आलबेल नाही
नवी मुंबईच्या राजकारणात शिवसेनेच्या शिंदे गटात मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला असला, तरी पदाधिकाऱ्यांमध्ये काहीच आलबेल नाही. ऐरोली विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्यानंतर माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले हे सध्या पक्षात सक्रिय दिसत नाहीत. बेलापूरमध्ये निवडणूक लढवणारे उपनेते विजय नाहटा काही दिवसांपासून स्थानिक राजकारणात दिसत नाहीत. अंतर्गत हेवेदावेमुळे प्रवेश केलेल्यांनी परतीचा मार्ग गाठला आहे. बेलापूर मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख किशोर पाटकर हेच पक्षाचा गाडा हाकताना दिसत आहेत. अशा अंतर्गत नाराजीचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
२०१५ निवडणुकीतील राजकीय चित्र
राष्ट्रवादी काँग्रेस ५२
काँग्रेस १०
शिवसेना ३८
भाजप ०६
अपक्ष ०५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

