गुलाबी थंडीमुळे पेटताहेत शेकोट्या

गुलाबी थंडीमुळे पेटताहेत शेकोट्या

Published on

मिनी महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका
ऊब घेण्यासाठी पेटताहेत शेकोट्या
जव्हार, ता. १५ (बातमीदार) : समुद्रसपाटीपासून शेकडो मीटर उंचीवर असलेले आणि मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा जोर वाढला आहे. तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली आल्यामुळे नागरिकांना ऊब मिळावी म्हणून ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसत आहेत.
कोकण परिसरात थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. पालघर जिल्ह्यालाही या थंडीचा मोठा फटका बसला असून, उत्तरेकडील वाढत्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जव्हार शहरात रविवारी (ता. १४) तापमानाचा पारा १२ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेला होता, ज्यामुळे शहरात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे.
थंडीची लाट किंवा शीत लहर ही एक हवामानीय घटना आहे, ज्यामुळे तापमान सरासरीपेक्षा खूप कमी होते. उच्च वेगाच्या थंड वाऱ्यांमुळे हवामान प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा जास्त थंड जाणवते. या घटनेचा मानवी जीवन, शेती, पशुधन आणि वन्यजीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. वाढत्या शीत लहरींमुळे शरीराच्या तापमानावर विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात. यात विशेषतः गरोदर महिला, लहान बालके, वयोवृद्ध नागरिक आणि श्वसनाच्या आजाराच्या व्यक्ती अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.
------------------------
आरोग्य संस्थांना सूचना
वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा स्तरावरून आरोग्य संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी वाढत्या थंडीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
------------------------
थंडीचे कपडे बाळगा, एकावर एक असे अनेक कपडे घालणेही उपयुक्त, पूर्ण हात सलगपणे झाकला जाईल असे मोजे वापरा, वृद्धांची आणि लहान मुलांची काळजी घ्या, नियमितपणे गरम पेय प्या, मद्यपान केल्याने शरीराचे तापमान कमी होते, लहान व ज्येष्ठांनी टोपी, स्वेटर असे उबदार कपडे घालावेत, थंडीमुळे आजारांकडे दुर्लक्ष करू नका.
- डॉ. संजय कावळे, वैद्यकीय अधीक्षक, जव्हार उपजिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com