पर्यटन क्षेत्राला उभारी

पर्यटन क्षेत्राला उभारी

Published on

पर्यटन क्षेत्राला उभारी
जव्हार, केळवेच्या विकासासाठी पाच कोटींची तरतूद
पालघर, ता. १५ ः महाराष्ट्राचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेला निसर्गरम्य जव्हारच्या पर्यटन क्षेत्र, केळवे समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीने विकास आराखड्यात पाच कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे पर्यटकांसाठीच्या विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
जव्हार तालुका निसर्गरम्य डोंगररांगा, धबधबे, आदिवासी संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तू यांसाठी ओळखला जातो. जव्हारच्या इतिहासाची साक्ष देणारा मुकणे राजघराण्याचा ऐतिहासिक जय विलास पॅलेस, दरवर्षी हजारो पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिलेले दाभोसा, काळमांडवी धबधबा, जयसागर, खडखड डॅम, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शिरपामाळसह हनुमान, कोकणकडा, सनसेट पॉइंट स्थळे आहेत. यासह हिरवागार प्रदेश, डोंगररांगा आणि येथे आदिवासी अर्थात वारली कलेचे आकर्षण आहे, तर केळवा समुद्रकिनारासाठी उत्तम पर्याय असल्याने किनारा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येत आहेत, मात्र जव्हार आणि केळवा येथे मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत होती. त्यामुळे पर्यटन विकास समिती अंतर्गत विविध सुविधा उभारणीसाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत निधी दिला आहे.
--------------------------
या सुविधांवर भर
जव्हार पर्यटन विकासासाठी दोन कोटी, तर केळवे पर्यटन विकासासाठी तीन कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. याअंतर्गत पर्यटकांना फिरण्यासाठी चांगली उद्याने, पर्यटन केंद्र, स्कायवॉक, पायवाटा, वॉकिंग झोन, ॲम्पि थिएटर अशा विविध सुविधा दिल्या जाणार आहेत. पुढील टप्प्यांमध्ये ब्ल्यू फ्लॅग कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील किनारे विकसित करून पर्यटकांना शंभर टक्के सुविधा देण्याचा मानस जिल्हा नियोजन समितीचा आहे.
----------------------------------
वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधा
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून आणि जिल्हा नियोजन तसेच राज्याच्या विविध लेखाशीर्षंतर्गत जव्हार पर्यटन क्षेत्रांच्या विकासासाठी आलेला निधी केवळ बांधकाम आणि इतर कामांसाठी खर्च केला आहे, मात्र पर्यटन क्षेत्राच्या विस्तारासह रस्ते, वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. हॉटेल्स, लॉज, रहिवासगृह आणि स्वच्छतागृह, प्रसाधनगृहे, परवडणारी सरकारी निवास व्यवस्था, अशा सुविधा नसल्याने गैरसोय होते.
--------------------------------
विस्ताराचे फायदे
- इको-टुरिझम प्रकल्प राबवणे
- होम-स्टे, फार्म-स्टे संकल्पना
- पायाभूत सुविधांचा विकास
- वारली कलेला वाव
- पर्यटन मार्गदर्शक प्रशिक्षण
- स्थानिक युवकांना रोजगार
- हॉटेल-भोजनालय व्यवसायाला चालना
- महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी
-----------------------------------
जिल्ह्यातील पर्यटनाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पर्यटन विकास समिती स्थापन केली आहे. त्याअंतर्गत पर्यटकांना आवश्यक सुविधा समावेश असलेल्या पर्यटनाचा शाश्वत विकास आराखडा तयार केला आहे. काही कामे प्रास्तावितही आहेत.
- प्रशांत भामरे, सदस्य सचिव, जिल्हा पर्यटन विकास समिती, पालघर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com