पालिकेसाठी राजकीय हालचाली सुरू

पालिकेसाठी राजकीय हालचाली सुरू

Published on

पालिकेसाठी राजकीय हालचाली सुरू
मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्ष्यांमध्ये चढाओढ; जागावाटपाचे आव्हान
मुंबई, ता. १५ ः राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून मुंबई महापालिका निवडणुकीसाठीदेखील १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल लागणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपल्यापासून, सध्या प्रशासक पालिकेचा कारभार पाहत आहेत. आता निवडणुका जाहीर झाल्याने राजकीय पक्ष कामाला लागले असून राजकीय डावपेचांना सुरुवात होणार आहे.
या निवडणुकीत प्रामुख्याने दोन मोठे गट समोरासमोर उभे ठाकण्याची चिन्हे आहेत. ‘महायुती’विरोधात ‘महाविकास आघाडी’ अशी लढत असली तरी शिवसेनेचा ठाकरे गट-मनसे युतीची शक्यता ही अधिक आहे. या दृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या असून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात झाली आहे.

जागावाटपाची कसरत
राज्याच्या राजकारणासाठी करण्यात आलेल्या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट  आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचा समावेश आहे. महापालिका निवडणुकीला हे पक्ष महायुतीच्या माध्यमातून सामोरे जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे; पण महायुतीतील मुख्य आव्हान जागावाटपाचे आहे. भाजप १५० जागांवर लढण्यास आग्रही आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना १०० पेक्षा अधिक जागांवर दावा करत आहे. दोन्ही पक्षांना एकमेकांना योग्य वाटा देऊन युती टिकवणे आवश्यक आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुंबईत फारशी ताकद नसल्याने ते मिळेल ते पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
मराठी-अमराठी समन्वयासाठी व्यूहरचना
शिवसेना फुटीनंतर पारंपरिक मराठी मतदारांमध्ये झालेली विभागणी, तसेच भाजपचा शहरी आणि बिगर-मराठी मतदारांवरील प्रभाव या दोहोंचा समन्वय साधणे हे मोठे आव्हान आहे. ही मोट बांधण्यासाठी सर्वच पक्ष आपली ताकद पणाला लावणार आहेत.

साडेतीन वर्षे नगरसेवकाविना
गेली साडेतीन वर्षे पालिकेवर प्रशासक असल्याने जनतेला थेट निवडून आलेले प्रतिनिधी नसण्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जाऊ शकतो.

ठाकरे ब्रँडची ताकद
महायुतीसमोर सर्वाधिक आव्हान हे महाविकास आघाडीचे असले तरी ‘ठाकरे ब्रँड’ची संभाव्य ताकददेखील महत्त्वाची ठरणार आहे. सध्या उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत आहेत. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे यांनी सध्या एकीची वज्रमूठ उभारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हे निश्चितच भाजप पर्यायाने महायुतीसमोर आव्हान उभे असणार आहे.

काँग्रेसची ‘एकला चलो’ची भूमिका
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू यंदाच्या महापालिका निवडणुकीत पहिल्‍यांदाच एकत्र दिसणार आहेत. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून ‘ब्रँड ठाकरे’ एकत्र आल्यास महायुतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे दोन्ही ठाकरे फक्त कौटुंबिक नाही तर राजकीय मंचावर एकत्र येतात का, याकडे लागले आहेत. फक्त महायुतीमधील पक्षांचेच नाही तर महाविकास आघाडीतील काँग्रेसचे लक्षदेखील त्‍यांच्या युतीकडे लागून आहे. काँग्रेसने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याने मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे.

मराठी मतदारांची सर्वच पक्षांत विभागणी
शिवसेना ठाकरे गट सहानुभूती आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करेल. मनसेसोबत आल्यास हे ध्रुवीकरण अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे; मात्र राजकीयदृष्ट्या दोन्ही ठाकरे एकत्र आल्याची घोषणा अद्यापही कुणाकडूनही झालेली नाही. त्‍यामुळे कार्यकर्तेदेखील संभ्रमावस्थेत आहेत. मनसेला महाविकास आघाडीसोबत घेण्यास काँग्रेसची काहीशी नाराजी असल्याचे दिसते त्यांच्या नेत्यांकडून वारंवार होत असलेल्या वक्तव्यातून हे अधिक अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मनसे महाविकास आघाडीत सहभागी होईल का, याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे. मनसे थेट महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली नाही तरी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करून ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत सहभागी होईल, अशीदेखील शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करीत आहेत.

स्थानिक विकासाचे मुद्दे  
पालिकेच्या कारभारात गैरव्यवहार, भ्रष्टाचार किंवा स्थानिक पातळीवरील समस्या (उदा. रस्ते, पाणी, आरोग्य) हे मुद्दे उचलून धरण्याचे आव्हान विरोधकांसमोर असेल.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे
- दोन्ही बाजूंच्या युत्यांमध्ये जागावाटप कशा प्रकारे होते, यावर निकालाचा मोठा प्रभाव असेल.
- धनुष्यबाण चिन्ह आणि मूळ शिवसेना कुणाची, या वादाचा परिणाम मतदारांवर कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- मुंबईतील पायाभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न निवडणुकीच्या प्रचारात केंद्रस्थानी असतील. या निवडणुकीत राजकीय डावपेच, युती-आघाडीची गणिते आणि मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

२०१७चे पक्षीय बलाबल
(एकूण २२७ जागा) :
- शिवसेना (एकत्रित) ८४
- भाजप ८२
- काँग्रेस ३१
- राष्ट्रवादी काँग्रेस ९
- मनसे ७
- समाजवादी पक्ष ६
- इतर/अपक्ष ८
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com