सहा महापालिकांत रणसंग्राम
सहा महापालिकांत रणसंग्राम
६२७ नगरसेवकपदांसाठी जोरदार लढत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडत असताना ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर आणि नवी मुंबई या सहा महापालिकांच्या निवडणुकींचे बिगुल वाजले आहे. या सहा महापालिकांमधील एकूण ६२७ नगरसेवकपदांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.
राज्याच्या सत्ताकेंद्रामध्ये मुंबईनंतर सर्वाधिक महत्त्व ठाणे जिल्ह्याला आले आहे. जिल्ह्यात सहापैकी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या तीन महापालिका प्रतिष्ठेच्या मानल्या जातात. हजारो कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या या महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यातच ठाणे आणि नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण- डोंबिवलीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे विरुद्ध भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, असा संघर्ष सुरू आहे. मुंबई आणि ठाण्यात या भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये महायुती झाल्यामुळे सध्या वातावरण शांत आहे, पण आता निवडणूक कार्यक्रम लागू झाल्यामुळे जागावाटपावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाविकास आघाडीसमोर अस्तित्वाचे आव्हान
जिल्ह्यातील बहुतेक सर्वच महापालिकांमध्ये शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस, मनसे अशी महाविकास आघाडी होण्याची शक्यता आहे. या सर्वच पक्षांचे सध्याच्या घडीला पक्षीय बलाबल कमकुवत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला या निवडणुकीत अस्तित्व टिकवण्याचे आव्हान असणार आहे.
महापालिका, सदस्य संख्या
ठाणे- १३१
भिवंडी-निजामपूर- ९०
कल्याण-डोंबिवली- १२२
नवी मुंबई - १११
मिरा-भाईंदर- ९५
उल्हासनगर - ७८
एकूण ६२७
समीकरण बदलले
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल २०२२ नंतर पूर्णपणे विस्कटले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत झालेली बंडखोरी, प्रमुख नेत्यांनी भाजप, शिवसेनेत केलेले पक्षप्रवेश यामुळे महापालिकांच्या २०२६च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे दोनच प्रमुख दावेदार असणार असल्याचे दिसते.

