पालघरच्या वैभवात भर

पालघरच्या वैभवात भर

Published on

९९ हेक्टरवर ‘इको पार्क’
पालघरच्या वैभवात भर; पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन
पालघर, ता. १५ (बातमीदार) : पालघर शहराच्या सौंदर्यात आणि पर्यावरण संवर्धनात मोलाची भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘पालघर इको पार्क’ प्रकल्पाचा भूमिपूजन आणि कार्यारंभ सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे या प्रकल्पाची विधिवत पायाभरणी करण्यात आली.
या वेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. हा प्रकल्प पालघरकरांसाठी निसर्गाच्या सान्निध्यात एक हक्काचे विरंगुळा केंद्र ठरेल आणि शहराचे ‘ग्रीन लंग्स’ म्हणून कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या महत्त्वपूर्ण प्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख एम. श्रीनिवास राव, मुख्य वनसंरक्षक ठाणे एन. आर. प्रवीण आणि उपवनसंरक्षक डहाणू निरंजन दिवाकर यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
डहाणू वन विभागामार्फत साकारला जाणारा हा भव्य प्रकल्प पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील वनपरिक्षेत्र क्रमांक १३१ मध्ये ९९ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेला आहे. या भव्य प्रकल्पासाठी अंदाजे १३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, याचे काम २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांच्या कालावधीत तीन टप्प्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वेगाने शहरीकरण होत असलेल्या पालघरमध्ये पर्यावरणीय समतोल राखणे आणि नागरिकांना शहराच्या मध्यभागी निसर्गाचा अनुभव देणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उ‌द्दिष्ट आहे. ‘पालघर इको पार्क’ हे केवळ एक उद्यान नसून, ते आरोग्य आणि निसर्ग शिक्षणासाठी एक परिपूर्ण संकुल असणार आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालघरच्या नागरिकांना निसर्गाशी जोडले जाण्याची संधी मिळेल, असा वनविभागाचा मानस आहे.

उपलब्ध सुविधा
आरोग्य सुविधा : जॉगिंग आणि वॉकिंग ट्रॅक
पर्यावरण संवर्धन : कमी जागेत घनदाट वृक्षराजी निर्माण करणारे ‘मियावाकी घनवन’
मानसिक शांतता : विशेष ‘योग साधना मंच’
शैक्षणिक विभाग : बांबूच्या विविध प्रजातींचे जतन करणारे ‘बॅम्बुसेटम’, स्थानिक वनस्पती आणि प्राणी यांची ओळख, तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विशेष विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com