मुलांच्या आरोग्याशी खेळ

मुलांच्या आरोग्याशी खेळ

Published on

मुलांच्या आरोग्याशी खेळ
विद्यार्थ्यांच्या वापरासाठी सांडपाणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : दिव्यातील मातोश्रीनगर येथील एका खासगी शाळेत लहान मुलांच्या आरोग्याशी खेळला जात असलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील ड्यू ड्रॉप नावाच्या शाळेत पाण्याची मोटार लावून चक्क गटाराचे पाणी विद्यार्थ्यांना बाथरूममध्ये वापरायला दिले जात होते. काही पालकांनी दिवा मनसेच्या महिला शाखाध्यक्ष अंकिता कदम यांच्याकडे शाळेत गटाराचे पाणी वापरले जात असल्याची तक्रार केली. दरम्यान, महापालिका शिक्षण विभागाकडे यासंदर्भात संपर्क केला असता, पालिका उपायुक्त सचिन सांगळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

तक्रारीची खात्री करण्यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १३) शाळेला भेट दिली. त्या वेळी ही धक्कादायक बाब उघड झाली. या वेळी शाळा संचालक उत्तम सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने या घटनेचे व्हिडिओ पुरावे ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांच्या निदर्शनास आणून दिले. उपायुक्तांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पाहणीसाठी शिक्षण विभागाचे पथक पाठवत असल्याचे सांगितले. मनसेचे दिवा शहर सचिव प्रशांत गावडे यांनी सांगितले की, ‘पालकांच्या तक्रारीनुसार पाहणी केल्यानंतर ही धक्कादायक बाब पुढे आली. याप्रकरणी शिक्षण विभागाने काय कारवाई केली, याची विचारणा महापालिकेत जाऊन केली जाईल.’

..
आरोप चुकीचे
ड्यू ड्रॉप शाळेचे संचालक उत्तम सावंत यांनी सांगितले की, ‘२०१५मध्ये या शाळेला मान्यता मिळाली असून, या ठिकाणी ४५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांनी शाळेत येऊन पाहणी केली त्या वेळी शाळेत ठाणे महापालिकेच्या नळाला पाणी होते; त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहे. शिक्षण विभागानेही शाळेची पाहणी केली आहे, मात्र मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा अशाप्रकारे आरोप करण्याचा नेमका काय उद्देश आहे. हे समजू शकले नाही.’

Marathi News Esakal
www.esakal.com