संसार तुटता तुटता वाचला

संसार तुटता तुटता वाचला

Published on

संसार तुटता तुटता वाचला
५०८ जोडप्यांच्या गाठी पोलिसांनी पुन्हा जुळवल्या
ठाणे शहर, ता. १६ (बातमीदार) : पती-पत्नीमधील क्षुल्लक वाद आणि विसंवादामुळे घटस्फोटापर्यंत पोहोचलेल्या ५०८ जोडप्यांचे संसार पुन्हा सावरण्यात ठाणे पोलिसांच्या ‘भरोसा कक्षा’ला यश आले आहे. गेल्या ११ महिन्यांत आयुक्तालयाकडे आलेल्या २९४० तक्रार अर्जांपैकी अनेक जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य पोलिसांनी केले आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयांतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर येथे ‘भरोसा कक्ष’ कार्यरत आहेत. वैवाहिक वादाच्या तक्रारी आल्यानंतर, तज्ज्ञ समुपदेशक पती-पत्नी आणि त्यांच्या सासरच्या मंडळींशी संवाद साधतात. वादाची मूळ कारणे शोधून त्यांचे समुपदेशन केले जाते. ज्या प्रकरणांत एकत्र येणे शक्य नसते, त्यांना कायदेशीर मदतीचा मार्ग दाखवला जातो.

ठाणे पोलिस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर तालुक्यात अशा प्रकारचे भरोसा कक्ष सुरू आहेत. या कक्षात मागील ११ महिन्यांमध्ये पती-पत्नींकडून आलेल्या विविध प्रकारच्या तक्रारी अर्जांवर काम करून त्यांना कायदेशीर मदत देण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत आलेल्या तक्रारींमधून ५०८ पती-पत्नींना पुन्हा नव्याने संसार सुरू करण्याची वाट दाखवली आहे. त्यांचे समुपदेशन करून सुख-दुःखात कायम एकमेकांसोबत राहण्यासाठी एकत्र आणले आहे. विखुरलेले संसार पुन्हा जोडण्यासाठी पोलिस निरीक्षक चेतना चौधरी, पोलिस उपनिरीक्षक जयश्री कदम, शुभदा पार्टे, कविता भोईर, हवालदार संगीता महाले, पल्लवी राऊत, तसेच समुपदेशक ॲड. साधना निंबाळकर व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.


अर्जांची संख्या
शहर अर्ज
उल्हासनगर १०५०
कल्याण ७१०
ठाणे ६५३
भिवंडी ६३८

११ महिन्यांचा लेखाजोखा (जानेवारी ते नोव्हेंबर)
एकूण आलेले अर्ज: २९४०
पुन्हा एकत्र आलेली जोडपी (समजोता): ५०८
पोलिस कारवाई झालेली प्रकरणे: ६९४
न्यायालयीन प्रक्रियेतील प्रकरणे: ४८६
प्रलंबित अर्ज: ४२४

ठाणे जिल्ह्यातील चारही केंद्रांवर पीडित पती-पत्नींना कायदेशीर आणि मानसिक आधार दिला जातो. तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यावर सखोल चर्चा करून योग्य ती कार्यवाही केली जाते. जास्तीत जास्त संसार वाचवणे हाच आमचा उद्देश असतो.
-चेतना चौधरी, पोलिस निरीक्षक, भरोसा कक्ष, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com